गडचिरोली : देसाईगंज शहरातील एक नामांकित सराफा व्यापारी आणि त्याचा साथीदार यांच्याविरोधात एका २३ वर्षीय तरुणीने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता.
सुनील पंडलिक बोके (४८) आणि अक्षय कुंदनवार (३२)अशी आरोपींची असून दोघेही देसाईगंजचे रहिवासी आहेत. बोके याचे गांधी वॉर्ड परिसरात ‘राधा ज्वेलर्स’ नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. या दुकानात कामाच्या निमित्ताने पीडित तरुणीचा संपर्क सुनील बोके याच्याशी आला. यानंतर सुनीलने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधली. तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने विविध ठिकाणी, कधी आपल्या राहत्या बंगल्यात, तर कधी स्वतःच्या कारमध्ये तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
यावेळी त्याने पीडितेचे काही खासगी फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या मानसिक त्रासामुळे आणि धमक्यांमुळे पीडिता दीर्घकाळ गप्प बसली. मात्र, काही महिन्यांनी तिला समजले की, सुनीलचे आधीच लग्न झाले आहे. त्यामुळे तिने त्याच्याशी संबंध तोडले आणि मोबाईल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला.
त्यानंतर, सुनीलने त्याचा मित्र अक्षय कुंदनवार याच्यामार्फत पीडितेवर पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अक्षयने तिच्याशी संपर्क साधून सुनीलशी पुन्हा बोलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या सर्व त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर धाडस करून रविवारी (दि. १७ ऑगस्ट) देसाईगंज पोलिस ठाण्यात सुनील बोके आणि अक्षय कुंदनवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलिसांनी १७ ऑगस्टला सुनील बोकेच्या नागपुरात मुसक्या आवळल्या तर अक्षय कुंदनवार यास देसाईगंजातूनच उचलले. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी दिली.
तक्रार मागे घेण्यासाठी राजकीय दबाव ? पीडिता पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याची कुणकुण लागताच शहरातील एका कथित वादग्रस्त नेत्याने दबावतंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने ठामपणे तक्रार दिली व पोलिसांनी तिला धीर देत गुन्हा नोंदवून घेतला, त्यामुळे या कथित नेत्याचा हस्तक्षेपाचा प्रयत्न फोल ठरला.