नागपूर: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दनदणीत विजय झाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक नेते पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट अथवा भाजपसह महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश घेत आहे. या पक्षांतरावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी नागपुरात भाष्य केले.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे नागपुरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विदर्भात ओबीसी मंडल यात्रा सुरू होत आहे. आम्ही सर्व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही सुरुवात आहे. विदर्भ हा आधीपासूनच राष्ट्रवादीच्या विचारांचा राहिला आहे.

सध्या केंद्र आणि राज्यातही सत्तांतर झाले आहे. त्यानंतरही विदर्भ राष्ट्रवादी विचारांच्या पाठीमागे उभा राहिला आहे. लोकसभा निवडणूकीत ते दिसून आले आहे. आज अनेक पक्षाचे लोक सोडून गेले तरी नवीन कार्यकर्ते नवीन पक्ष उभारणी करणार आहे. आम्ही पुरोगामी महाराष्ट्राची ओळख या माध्यमातून दाखवणार आहोत.

ओबीसी समाजासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी राज्यात शरद पवार यांनीच सुरू केली होती. सध्या राज्यात वेगवेगळे भाषावाद आणि जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या मंडल  यात्रेतून समाजातील शेवटच्या व्यक्तीलाही आम्ही राज्यातील सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे वादावरून म्हणाले…

राज्यकर्त्यांनी कुठेतरी समजदारीची भूमिका घ्यावी. एखाद्या वेळेस आमोरासमोर आल्यावर कार्यकर्त्यांचा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. एकमेकाला आव्हान देण्याचा प्रयत्न होत असेल आणि ते सरकार कडून होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

स्थानिक नेत्यांना अधिकार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहेत. आम्ही प्रयत्न करतोय महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीला समोर जावे म्हणून. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोकसभेत लोकांनी ऐतिहासिक मताने निकाल दिला आहे. विधानसभेत त्याची जाणीव झाल्यामुळे राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे विधानसभेला मतांची चोरी झाली. त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात मताचे विभाजणी न होता भविष्यकाळात चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातून हे सरकार बाजूला काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही शशीकांत शिंदे म्हणाले.