लोकसत्ता टीम

वर्धा : सुंदर हस्ताक्षर हे व्यक्तीचे एक वेगळे वैभव समजल्या जाते. आखीव रेखीव, टपोरे, वळणदार, नीटस अक्षरातील वाक्ये बोलकी व लक्षवेधी ठरतात. उलट डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वाचायची कशी, असा प्रश्न पडतो. त्यांनी चांगल्या अक्षरात लिहावे यासाठी प्रसंगी काही न्यायालयात पण गेले. अक्षर महिमा ती काय वर्णावी. याचा संदर्भ येथील एका चिमुरडीच्या हस्ताक्षर कौशल्याने आला. तिची अक्षरे तिला राज्यात नाव उज्वल करणारी ठरली.

स्थानिक सेंट ऍंथोनी कॉन्व्हेंट स्कुलची विद्यार्थिनी शर्वरी संघपाल राऊत हीने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. विझ इंटरनॅशनल स्पेलिंग बी या देशातील अग्रगन्य संस्थेने या स्पर्धेचे आयोजन राज्य पातळीवर केले होते. स्पेलिंग बी ही संस्था हस्ताक्षर क्षेत्रात देशातील सर्वात जुनी व पहिली अशी संस्था आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. देशभरातून हजारो शालेय विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असतात.

आणखी वाचा-“काँग्रेसची अवस्था रंगमंचावरील ‘नाच्या’सारखी”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका

कोविड काळात विद्यार्थ्यांचे लेखन बंद पडले होते. लिहण्याची सवय तुटली होती. म्हणून २०२१ पासून सदर संस्थेने या उपक्रमास व्यापक स्वरूप देत आरंभ केला. स्पेलिंग, उच्चार, फोनोटीक मजबूत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते, अशी माहिती संस्थेच्या विदर्भ समन्वयक मोनाली लोणकर यांनी दिली. अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर हे देशातील हस्ताक्षर तज्ञ तपासतात. पहिला क्रमांक प्राप्त झालेल्या शर्वरी हिचे हस्ताक्षर पेपर आता राष्ट्रीय पातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेसाठी पाठविल्या जाणार आहेत.

संस्थेने पुरस्कारप्राप्त स्पर्धाकांचा एका कार्यक्रमात सन्मान केला. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते शर्वरीचा सत्कार करण्यात आला. भारतीय वैद्यक परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. जयंत मकरंदे, प्रसिद्धी आरटीआय कार्यकर्ते डॉ. इंद्रजित खांडेकर व डॉ. अर्पिता सिंघम यांची प्रमुख उपस्थिती होती. माझी आजी हीच माझी प्रेरणास्रोत असून आमच्या कुटुंबाचा आधार ठरते. मला चांगले लिहता यावे , माझे हस्ताक्षर सुंदर दिसावे, यासाठी मला बालपणापासून घरच्यांनी प्रेरणा दिली. हस्ताक्षर स्पर्धेत मी माझ्या आजीवरील भावनाच लिहून व्यक्त केल्यात, असे मत शर्वरी व्यक्त करते. वैष्णवी सूर्यवंशी या विद्यार्थनीस चौथा क्रमांक मिळाला आहे.

आणखी वाचा-वर्धा : परवाना रद्द ते आता ऑनलाईन व्यवहार करण्यास सज्ज! असा आहे ‘या’ बँकेच्या वाटचालीचा यशस्वी प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांगले हस्ताक्षर असावे म्हणून जुनी पिढी लहानपणीच मुलांकडून घोटून घ्यायची. गुरुजन, आईवडील हे हात धरून अक्षराचे धडे गिरवायचे. पाठ ताठ ठेवून मध्यमेवर लेखणी पेलून सहज लिहण्याचा सल्ला मिळायचा.अक्षराची लांबी, रुंदी, जाडी प्रमाणबद्ध असावी. समांतर अंतर ठेवावे, अक्षराचा आरंभबिंदू महत्वाचा,आधी डावी बाजू व मग अक्षराची उजवी बाजू लिहावी अश्या स्वरूपाचे मार्गदर्शन होतं. एक शब्द म्हणजे एक मोती तर वाक्य म्हणजे मोत्यांची माळ वाटावी, अशी सूचना केल्या जात असल्याचे एक ज्येष्ठ शिक्षक सांगतात.