बुलढाणा: नाताळ निमित्त असलेल्या सुट्ट्यांमुळे सध्या राज्यातील पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे पर्यटक आणि भाविकांनी गजबजली आहेत. याला विदर्भ पंढरी म्हणून विख्यात शेगाव नगरी देखील अपवाद नाही.

आज २६ डिसेंबर रोजी सकाळपासून दिवसभर संतनगरी शेगावमध्ये हेच दृश्य पाहवयास मिळाले. मार्गशिष् महिन्याचा चौथा गुरुवार आणि एकादशी असा दुग्ध शर्करा योग जुळून आला. यामुळे संतनगरीत कमीअधिक पाऊण लाख भाविकांची मांदियाळी जमल्याचे दिसून आले. यामुळे संत गजानन महाराज संस्थान मंदिर परिसर ते मंदिराकडे येणारे मार्ग आबालवृद्ध भाविकांनी नुसते फुलून गेल्याचे चित्र होते. विदर्भासह राज्यातील हजारो भाविक, बुधवारपासूनच शेगाव नगरीत डेरे दाखल झाले होते. तसेच नजीकच्या जिल्ह्यातील पायी दिंड्याचे देखील आगमन झाले. त्यांच्या निवासाची संस्थानमार्फत सुसज्ज व्यवस्था करण्यात आली.

हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, परिवहन मंत्र्यांच्या घोषणेवर संघटना म्हणते…

दर्शनासाठी तीन तास

‘श्रीं’ च्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी भाविकांच्या आज गुरुवारी पहाटेपासूनच रांगा लागल्याचे दिसून आले. उत्तरोत्तर दर्शन बारीतील गर्दी वाढतच गेली. आज मध्यान्ही या गर्दीने कळस गाठला. प्रत्यक्ष दर्शनासाठी तीन तास लागत होते. मुख दर्शनासाठी वीस मिनिटे ते अर्धा तास लागत होते. दुसरीकडे संस्थानकडून मोफत वितरित करण्यात येणाऱ्या महाप्रसादासाठी भाविकांच्या दीर्घ रांगा लागल्या.

शेगाव येथे येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या एसटी बसेसमधून मोठ्या प्रमाणात भाविक बाहेर पडताना दिसत होते. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. श्री संस्थानकडून भाविकांसाठी आज पहाटे ४ वाजतापासून श्रींचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. भाविकांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला असून मंदिरामध्ये सकाळी १० ते ५ पर्यंत महाप्रसाद, श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासाची नियमानुसार राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३१ ला रात्रभर खुले

संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्ष स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.