नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप करत नाव न घेत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ झाला. या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज पाचवेळा तहकूब करावं लागलं.

भरत गोगावले म्हणाले, “मी या सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. ९ जून २०२० रोजी दिशा सालियन नावाच्या एका युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी अद्याप केलेली नाही. दिशाच्या मृत्यूच्या कारणापर्यंत अद्यापही पोलीस पोहचले नाहीत. त्यामुळे दिशा सालियनचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला याची चौकशी व्हावी.”

“दिशाला घरातून खाली फेकून देण्यात आले”

“दिशा सालियनने स्वतः मालाडच्या घरावरून उडी मारून आत्महत्या केली की तिला वरून खाली फेकून देण्यात आले याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस अद्यापही पोहचलेले नाहीत. दिशा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे काम सांभाळत होती. त्या दोघांमध्ये मोबाईल किंवा व्हॉट्सअॅपवर झालेलं संभाषण अद्याप उघड झालेलं नाही,” असं भरत गोगावले यांनी म्हटलं.

“दिशाने सुशांतला काही फोटो पाठवल्याने तिचा संशयास्पद मृत्यू”

गोगावले पुढे म्हणाले, “या प्रकरणात दिशाने सुशांत सिंहला काही माहिती किंवा फोटो पाठवल्याने तिचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर सुशांतचाही मृत्यू झाला. त्या प्रकरणात सीबीआयने अद्यापपर्यंत कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे गुढ अद्यापही उलगडले नाही. दिशा आणि सुशांतच्या मृत्यूत काहीतरी साम्य आहे,” असा आरोप गोगावलेंनी केला.

“दिशा मृत्यूच्या आधी कुठे होती?”

भरत गोगावलेंनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “दिशाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप उघड झाला नाही. दिशा मृत्यूच्या आधी कुठे होती, त्या ठिकाणी तिच्याबरोबर कोणकोण होते, त्या ठिकाणी काय घटना घडली हे समोर आलेलं नाही. त्यामुळे दिशाच्या मोबाईल आणि व्हॉट्सअॅपची पूर्ण चौकशी व्हायला हवी आणि मृत्यूचं कारण स्पष्ट करून कारवाई करावी.”

हेही वाचा : आत्महत्या, बलात्कार आणि खुनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दिशा आणि सुशांत प्रकरणाचा फेरतपास करा”

“या प्रकरणाची दिल्लीपर्यंत चर्चा आहे. त्याचा खुलासा या सभागृहासमोर व्हावा, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे या प्रकरणाचा फेरतपास होणं गरजेचं आहे,” असंही गोगावलेंनी नमूद केलं.