scorecardresearch

नागपुरात शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यावरून तणाव, नेमकं काय घडलं, संजय शिरसाट म्हणाले…

नागपूरमध्ये राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा ठाकरे गट आणि बंडखोर शिंदे गट चर्चेत आहे.

नागपुरात शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेण्यावरून तणाव, नेमकं काय घडलं, संजय शिरसाट म्हणाले…
संजय शिरसाट, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूरमध्ये राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, पहिल्या दिवसापासून शिवसेनेचा ठाकरे गट आणि बंडखोर शिंदे गट चर्चेत आहे. दोन्ही गटात अधिवेशनात पक्षाच्या कार्यालयावरूनही तणाव पाहायला मिळाला. यावरूनच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर शाब्दिक हल्ला चढवला. ते मंगळवारी (२० डिसेंबर) नागपूरमध्ये अधिवेशनासाठी आले असताना विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते.

संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे गटाचे आमदार काहिशा भांबावलेल्या स्थितीत आहेत. विधानसभेचं कामकाज नियमानुसार चालतं. एकनाथ शिंदेंचा ‘बाळासाहेंबाची शिवसेना’ हा ५० आमदारांचा मोठा गट आहे. दुसरा ठाकरे गट केवळ १५ आमदारांचा आहे. त्यामुळे संख्याबळानुसार आम्हाला अधिवेशनात मोठं कार्यालय दिलं होतं. आम्हाला अध्यक्षांनी ते दिलं होतं. मात्र, त्यांचा तो मुद्दा लक्षातच आला नाही.”

“ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता”

“आम्ही पूर्वीचे जे होतो तेच आता आहोत असं त्यांच्या डोक्यात होतं. आम्ही त्यांना असं नाहीये हे समजून सांगितलं. आता ठाकरे गट १४-१५ आमदारांवर आहे. भविष्यात ही आमदारांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना जे दुसरं कार्यालय दिलं तिथे त्यांनी जाऊन बसावं,” असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

“आमचा त्यांच्याशी कोणताही वाद नाही”

“नंतर त्यांच्याही ती चूक लक्षात आल्यावर ते तिकडे गेले. आमचा त्यांच्याशी कोणताही वाद नाही. अध्यक्ष जो निर्णय देतील त्यानुसार अधिवेशनाचं कामकाज चालेल हे त्यांना कळायला वेळ लागला आहे,” असं म्हणत शिरसाटांनी टोला लगावला.

व्हिडीओ पाहा :

“उद्धव ठाकरे ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्याच पक्षाच्या कार्यालयात गेले नाही”

दरम्यान, संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये आगमन झालं. मी टीव्हीवर त्यांचं जंगी स्वागत होताना पाहिलं. काल महाविकासआघाडीची बैठक होती, ती झाली नाही. आज ती बैठक झाली असं कळालं. परंतु दुर्दैवाने असं सांगावं लागेल की, उद्धव ठाकरे ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत, त्याच पक्षाच्या कार्यालयात ते गेले नाही. ते काँग्रेसच्या कार्यालयात गेले.”

“उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘बेबनाव’ आहे”

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली, पण पक्षाच्या कार्यालयाकडे ते फिरकले सुद्धा नाही. मला वाटतं, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेबनाव आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर राहण्याऐवजी काँग्रेसबरोबर राहण्याचा उद्धव ठाकरेंचा मनोदय असावा,” असं म्हणत संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

“…तर उद्धव ठाकरेंचा गट काँग्रेसच्या चिन्हावर लढेल”

“पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीत चिन्ह भेटलं नाही, तर उद्धव ठाकरेंचा गट काँग्रेसच्या चिन्हावर लढणार तर नाही ना अशी शंका येत आहे. म्हणूनच आज उद्धव ठाकरे विधानभवनात आले आणि विधान परिषदेत ते जाणार आहेत,” असं मत शिरसाटांनी व्यक्त केलं.

“राजीनामा दिला म्हणणारे उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आले, म्हणजे…”

संजय शिरसाट पुढे म्हणाले, “ठाकरे कुटुंब एकदा दिलेला शब्द कधी मोडत नाही. मात्र, उद्धव ठाकरेंनी मी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं विधान केलं होतं. आज तेच उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले आहेत. म्हणजे त्यांनी आज कोणाचं ऐकावं हाही त्यांच्यासमोर पडलेला प्रश्न आहे. कधी संजय राऊत, कधी शरद पवार, कधी अजित पवार, कधी काँग्रेस, कधी राहुल गांधी अशा द्विधा मनस्थितीत ते आहेत. म्हणून ते नागपुरात आले तर त्यांचं स्वागत करुयात.”

“निवडणुकीत ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर”

“ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी पाहिलं की ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये ते चौथ्या क्रमांकाच्या खाली जाऊ नयेत, अशी ईश्वराकडे प्रार्थना करुयात,” असा टोला शिरसाटांनी ठाकरे गटाला लगावला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 16:23 IST

संबंधित बातम्या