यवतमाळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भविष्यातील राजकीय स्थैर्याची चाचपणी करून विविध पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’ आणि ‘आऊटगोईंग’ सुरू झाले आहे. सध्या तरी जिल्ह्यात अनेकांनी पक्ष प्रवेशासाठी शिवसेना शिंदे गटास पहिली पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेत कार्यकर्त्यांची ‘इनकमिंग’ जोरात सुरू आहे.

प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा रूतबा पाहून त्यांच्या हाती यवतमाळ किंवा मुंबईमध्ये शिवसेनेचा झेंडा दिला जात आहे. शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये कर्तृत्व गाजवण्याची कोणतीच संधी मिळत नसल्याने सध्या या पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेसमध्ये तर दुसऱ्या फळीतील नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांविरूद्ध उघड बंड केले.

 वर्षानुवर्षे विवधि पदे अडवून बसलेल्या या वरिष्ठ नेत्यांना पदांवरून दूर केले नाही तर अन्य पक्षात जावून काँग्रेस पक्ष रिकामा करण्याचा थेट इशारा अनेक पदाधिकाऱ्यांनी दिला. त्याची गंभीर दखल प्रदेश काँग्रेसने घेतली. आता वरिष्ठ आणि कनिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर सोपविण्यात आली. मात्र तरीही काँग्रेसमधील नाराज कार्यकर्ते इतर पक्षाची चाचपणी करत असताना दिसत आहे.

दुसरीकडे नाराज असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात सहभागी होण्याचा सपाटा लावला आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शिवसेना उबाठा गट व काँग्रेससह इतर पक्षाच्या वरिष्ठ व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाल्याने आगामी निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या यशाची खात्री वाटत आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल, नेरच्या माजी नगराध्यक्षा वनिता मिसळे, यांच्यासह अनेक नगरसेवक, यवतमाळचे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, नगरसेविका दर्शना इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

 यावेळी बोलताना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पश्चिम विदर्भात १० हजारांवर कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. यावेळी पश्चिम विदर्भाचे नवनियुक्त विभागीय समन्वयक पराग पिंगळे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जीवन पाटील यांच्यासह तिन्ही जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

समन्वयकपदी पराग पिंगळे

शिवसेनेनेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर विदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. या पक्षातही विदर्भातील अनेक जिल्ह्यात दोन गट आहेत. त्याचा फटका पक्षाला बसू नये म्हणून यवतमाळ येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पराग उमाकांत पिंगळे यांची शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पिंगळे यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले. यापूर्वी पक्षाने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती केली. या दोन्ही नेत्यांवर आता यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमधील स्थानिक पातळीवरील वादावर तोडगा काढून समन्वय साधत पक्षाला विजयी करण्याचे आव्हान आहे.