युतीत जागा मिळाली नसल्याने संताप

नागपूर : भाजपच्या ताब्यात असलेले सेनेचे जुने मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात सेनेसाठी न मिळाल्याने तेथील पक्षाच्या नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. रामटेक येथून पक्षाचे माजी आमदार आशीष जयस्वाल तर हिंगणघाटमधून पक्षाचे उपनेते व माजी मंत्री अशोक शिंदे गुरुवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

वर्धा जिल्ह्य़ातील हिंगणघाट व नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक हे सेनेचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे मतदारसंघ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेत ढासळले. या दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या दोन्ही जागा मिळाव्या म्हणून सेनेने आग्रही भूमिका घेतली होती.

रामटेक  विधानसभा मतदारसंघातून आशीष जयस्वाल सलग तीन वेळा निवडून आले होते. २०१४ मध्ये युती तुटल्याने त्यांचा भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती झाल्यावर पक्षाने रामटेकच्या जागेची भाजपकडे मागणी लावून धरावी अशी इच्छा जयस्वाल यांची होती.  भाजपच्या पहिल्या यादीत रामटेकचे नाव नसल्याने ही जागा सेनेसाठी सोडली जाईल अशी चर्चा असतानाच बुधवारी भाजपच ही जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यावर जयस्वाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. जयस्वाल यांनी त्याला दुजोरा दिला.

अशोक शिंदे हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ते युतीच्या काळात राज्यमंत्री होते. सेनेने त्यांना उपनेते केले. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे समीर कुणावर यांनी पराभव केला होता.  जागावाटपात देवळीची जागा भाजपने शिवसेनेसाठी सोडली. पण सेनेने येथून राष्ट्रवादीतून आलेल्या समीर देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिंदे नाराज झाले आहेत. भाजपशी संघर्ष करणारे शिवसैनिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या व्यासपीठावर बसून प्रचार करणार नाहीत, अशी नाराजी एका शिवसैनिकाने व्यक्त केली.