नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. पण त्याची वाट न पाहता प्रत्येक प्रभागात चार उमेदवराचे पॅनल तयार ठेवा, अशा सूचना शिंदे सेनेचे राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे शिवसेनेने निवडणुकीसाठी स्वतंत्र वाटचाल सुरू केल्याचे दिसून येते.
शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी रविभवनमध्ये पार पडली. बैठकीला राज्यमंत्री आशीष जयस्वाल उपस्थित होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांशी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीत भाजपसोबत होणारी संभाव्य युती हा प्रमुख मुद्दा होता. युती झाली नाही तर काय करायचे यावरही मंथन झाले. युतीबाबत निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रभागात चार उमेदवारांचे पॅनल तयार ठेवावे. पक्ष वाढीसाठी निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे कोणाला किती मते मिळतात हे महत्वाचे नसून कार्यकर्त्यांना संधी देणे महत्वाचे आहे, असे जयस्वाल यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.
प्रभागनिहाय उमेदारांचे पॅनल तयार करून ठेवण्याची जयस्वाल यांची सूचना ही शिवसेना ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत मानली जाते. भाजपने १२० जागा जिंकण्याचा संकल्प केल्याच्या बावनकुळे यांच्या प्रतिपादनानंतरच शिवसेनेने ही बैठक घेतल्याने त्याला महत्व आहे. १५१ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेच्या प्रभाग रचनेचा मसुदा नुकताच जाहीर झाला.२०१७ च्या प्रभाग रचने प्रमाणे ही नवीन रचना आहे २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन जागा होत्या.पक्ष विभाजनानंतर शिवसेनेला अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहे.