बुलढाणा : बुलढाणा नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यावर ठाकरे सेनेच्या राज्य प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी गंभीर आक्षेप नोंदविले असून नव्याने रचना करण्याची मागणी केली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपालिकेची प्रभाग रचना करणे अपेक्षित असतानाही बुलढाणा नगरपालिकेने तयार केलेली प्रभाग रचना ही नियमबाह्य व नागरिकांच्या हिताला बाधक असल्याचा आरोप ॲड. शेळके यांनी केला. यासंदर्भात त्यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने सुस्पष्ट, न्याय्य व सुयोग्य प्रभाग रचना जाहीर करण्यात यावी, अशी मागणी केली.
शासनाच्या आदेशानुसार प्रभाग रचना उत्तर दिशेकडून सुरू करून सलग क्रमाने करणे अपेक्षित होते. मात्र, नगरपालिकेने ही प्रभाग रचना वायव्य दिशेपासून सुरू केली असल्यामुळे भौगोलिक सलगता भंग झाली. नैसर्गिक सीमा जसे की नदी, महामार्ग, रेल्वे मार्ग, प्रमुख रस्ते यांचा विचार न करता प्रभाग ठरवण्यात आले. अनेक ठिकाणची विभागणी गोंधळात टाकणारी आहे. प्रभागांची सीमा नागरिकांना समजेल अशा ‘लँडमार्क’ऐवजी शेत सर्वे नंबरवर आधारित करण्यात आल्याने प्रभाग रचना अधिकच अस्पष्ट आणि गुंतागुंतीची झाली आहे. याशिवाय, विदर्भ हाऊसिंग सोसायटीसारखी एकसंध वस्ती मुद्दाम दोन प्रभागांत विभागण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्यांचे अन्यायकारक विभाजन करून त्यांचे मतदारसंघ हेतुपुरस्सर विभाजित केले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. लोकसंख्येचे संतुलन न पाळता, नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार न करता नगरपालिकेकडून मनमर्जी पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आल्याचे दिसून येते, असे ॲड. शेळके यांनी सांगितले.
बसल्या जागी…
ही प्रभाग रचना स्थळ निरिक्षण न करता बसल्या ठिकाणी कागदोपत्री करण्यात आली. नागरिकांचा, मतदारांचा गोंधळ वाढवून विशिष्ट राजकीय पक्षाला, व्यक्तीला फायदा व्हावा, या उद्देशाने हेतूपुरस्सरपणे प्रभाग रचना करण्यात आली. सदर प्रभाग रचना रद्द करून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणीही ॲड. शेळके यांनी केली. यावर मुख्याधिकारी वा जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे हजारो मतदारांचे लक्ष लागले आहे.
प्रमुख आक्षेप
प्रभाग रचनाची सुरुवात उत्तर दिशेऐवजी वायव्य दिशेने.
भौगोलिक सलगतेचा भंग.
‘लँडमार्क’ऐवजी शेत सर्वे क्रमांकाचा आधार.
विदर्भ कॉलनीचे विभाजन अनाकलनीय.
राखीव वस्त्यांचे विभाजन. मतदारांचा गोंधळ करणारी रचना.