अमरावती :  यवतमाळ येथे जात असलेल्‍या शिवशाही बसला बडनेरा ते यवतमाळ मार्गावर माहुली चोर गावानजीक अचानक आग लागली. यामुळे या मार्गावर एकच गोंधळ उडाला. शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्‍या सुमारास ही घटना घडली.  बसमधून तीन जण प्रवास करीत होते. चालकाने वेळीच सावधगिरी बाळगत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अमरावती-यवतमाळ मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. अमरावती आगाराची शिवशाही बस माहुली चोर या गावानजीक पोहचली असताना बसच्या केबिनमधून धूर येण्यास सुरूवात झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या कडेला बस थांबवली. बसचालक आणि वाहकाने तीनही प्रवाशांना बाहेर काढले. बसने लगेच पेट घेतला. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूंची वाहतूक नियंत्रित केली. बसचालक,वाहक आणि प्रवासी सुखरूप आहेत.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वेळी महामार्ग परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्‍यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. शिवशाही बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वी ११ ऑक्टोबर २०२४ रोजी अकोला येथून अमरावतीकडे येत असलेल्‍या शिवशाही बसला बडनेरा ते अमरावती मार्गावर बडनेरा पोलीस ठाण्‍यासमोर टायर फुटून अचानक आग लागली होती. वेळीच सावधगिरी बाळगत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

२०२४ मध्येच अमरावती-नागपूर राष्‍ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ नजीक भरधाव शिवशाही एसटी बस रस्‍त्‍याच्‍या कडेला उलटून झालेल्‍या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्‍यू झाला होता, तर २८ जण जखमी झाले होते. त्यापूर्वी ४ एप्रिल २०२३ रोजी कोंढाळी जवळील साईबाबा मंदिर परिसरात शिवशाही बसला आग लागली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसला अचानक आग लागून बस जळून पूर्णपणे खाक झाली होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले आणि ते बचावले होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या आगीत काही प्रवाशांचे सामान जळाले होते. बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाला दिसल्यानंतर त्याने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कंडक्टर व प्रवाशांना सावध केले, त्‍यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.