आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध देशातील चित्रपट दाखवले जातात, पण त्यांना फारसा प्रेक्षकवर्ग लाभत नाही. त्याऐवजी जर भारतात तयार होणारे कलात्मक (आर्ट फिल्म्स) किंवा लोकप्रिय चित्रपट दाखवले तर त्याला मोठा प्रेक्षकवर्ग मिळेल, अशी सूचना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजकांना केली.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचा समारोप गडकरी यांच्या उपस्थितीत आज झाला. व्यासपीठावर फिल्म फेस्टीवलचे संचालक जब्बार पटेल, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मेश्राम, महापालिकेचे सहआयुक्त रवींद्र देवतळे व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी उपस्थित होत्या. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते रोहिणी हट्टंगडी यांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रशेखर मेश्राम यांनी प्रास्ताविक केले. महोत्सवाला मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उल्लेख करताना गेल्यावर्षी कुणाचीच मदत मिळाली नव्हती. यंदा नागपूर विद्यापीठ व महापालिकेने हातभार लावला. मात्र, तरीही आर्थिक चणचण जाणवली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गडकरी यांनी नागपूरची विविध क्षेत्रात कशी कोटीच्या कोटींची उड्डाणे सुरू आहेत, याचा लेखाजोखा मांडला. नागपूरला सांस्कृतिकदृष्टय़ा विकसित करण्यासाठी खासदार महोत्सव घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपट महोत्सवालाही मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
‘गांधी’मुळे माफ करायला शिकले -हट्टंगडी
यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची अजय गंपावार यांनी मुलाखत घेतली. त्यांनी हट्टंगडी यांना ‘गांधी’, ‘सारांश’, ‘अर्थ’ या चित्रपटांसह दिग्दर्शक महेश भट, बॉलिवूडची आई अशा अनेक विषयांवर बोलते केले. ‘कस्तुरबा’ची भूमिका करण्यासाठी सूतकताईपासून तर इंग्रजी भाषेपर्यंत सर्वच शिकावे लागले. २७ ते ७४ वयापर्यंतची ही भूमिका असल्यामुळे वयाचेही भान ठेवावे लागले. गांधी चित्रपटाने मला इतरांना माफ करायला शिकवले. एखादवेळी माणूस चुकतो, त्याला दुसरीच नाही तर तिसरीही संधी दिली पाहिजे, हे भान गांधीने दिले. कस्तुरबा महात्मा गांधींच्या मागे फरफटत गेल्या नाही तर चालत गेल्या, हेही कळाले, असे रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या. रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक चित्रपटात आईची भूमिका साकारली. अमिताभ, धर्मेद्र यांच्या आईची भूमिका केली. हे सर्व अभिनेते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. ‘हम से ना टकराना’ या चित्रपटात धर्मेद्रने रोहिणीजी माझ्यापेक्षा लहान दिसतात असे सांगून मेकअपमॅनला चेहऱ्यावर टचअप करायला सांगितले होते, असा किस्सा सांगितला. मला शेक्सपीअरमधील ‘लेडी मॅकबेथ’ची भूमिका करायला आवडेल, असेही त्यांनी सांगितले.