नागपूर : नागपूरकरांसाठी रविवारची संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. लोकप्रिय पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या लाईव्ह कन्सर्टने शहरात प्रचंड उत्साह निर्माण झाला. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगण, क्रीडा चौक येथे आयोजित या कार्यक्रमासाठी नागरिकांची अलोट गर्दी झाली. गर्दीमुळे मेडिकल चौक–रेशीमबाग चौक आणि तुकडोजी पुतळा चौक परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.
श्रेया घोषाल यांचा संगीत कार्यक्रम आणि रविवार याचा सुगम मेळ झाला असून आज नागपूरकरांनी श्रेया घोषाल यांच्या गायकीचा आनंद घेण्यासाठी तुफान गर्दी केली आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सव–२०२५ अंतर्गत आयोजित श्रेया घोषाल यांचा विशेष कार्यक्रम हा महोत्सवाचा प्रमुख आकर्षण ठरला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे दहावे पर्व अधिक मोठे, भव्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठरते आहे. सांस्कृतिक मूल्यांचे जतन, परंपरेचा वारसा पुढे नेणे आणि नवोदित कलाकारांना भक्कम मंच उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे.
२०१७ पासून सुरू झालेल्या या महोत्सवाने दहा वर्षांच्या प्रवासात अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा, आरोग्य आणि समाजकारण अशा १८ विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या कलाकारांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणणारा हा अद्वितीय सोहळा राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवत आहे. दरवर्षी कार्यक्रमात नव्या उंचीची भर पडत असून हजारो प्रेक्षकांच्या सहभागाने महोत्सवाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे.
या वर्षी ७ ते १८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित महोत्सवात देशभरातील कलावंत सहभागी होत आहेत. नागपूरकरांसाठी हा उत्सव केवळ मनोरंजनाचा नाही, तर संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास आणि सांस्कृतिक जागर निर्माण करणारा ठरला आहे. हा महोत्सव नागपूरकरांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा सोहळा आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाजाने, सुरेल सादरीकरणांनी आणि रंगतदार परफॉर्मन्सने नागपूरकर मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रम संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या उत्साहाची लाट ओसरण्याचे नाव घेत नव्हती. दहाव्या पर्वातील हा सुरेल प्रारंभ आगामी कार्यक्रमांची उत्सुकता अधिक वाढवणारा ठरला आहे.
