अमरावती: महानुभाव पंथाचे संस्थापक आणि तत्त्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक होत. चक्रधर स्वामींचा जन्म सन ११९४ मध्ये भाद्रपद शुद्ध द्वितीयेला झाला. त्यांचा जन्मदिवस हा शासकीय पातळीवर देखील ‘अवतार दिन’ म्हणून साजरा व्हावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.
अखेरीस सरकारने ही मागणी मान्य केली आहे. श्री चक्रधर स्वामी यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा भाद्रपद शुद्ध द्वितीया हा जन्म दिवस ‘अवतार दिन’ म्हणून मंत्रालय व सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा. हा ‘अवतार दिन’ साजरा करताना कोणते कार्यक्रम आयोजित करावेत, याबाबत स्वतंत्ररित्या सूचना निर्गमित करण्यात येतील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात सत्य, अहिंसा, मानवता, समानता ही जागतिक मूल्ये समाजाला दिली. श्रीचक्रधर स्वामींचे तत्वज्ञान, मानवतावादी कार्य, अलौकिक मराठी साहित्य आणि सामाजिक योगदानाची माहिती संपूर्ण विश्वाला होत असून स्वामींच्या विचारांचा सर्वत्र जागर होत आहे, असे परिपत्रकात नमूद आहे.
चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधीची माहिती लीळाचरित्राच्या या ग्रंथाच्या एकांक या भागात पाहायला मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजरातमधील भडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे पाळण्यातील नाव हरपाळदेव असे होते.
श्री चक्रधर स्वामींचे सेवाकार्य सुरू असताना लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे, अशी सबब घरी सांगितली. सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असताना हरपाळदेव अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील गोविंदप्रभू दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. गोविंदप्रभूंनी त्यांना श्री चक्रधर असे नाव दिले. १२०८ मध्ये लीळाचरित्र या ग्रंथाची निर्मिती झाली.