नागपूर : मानेवाडा मार्गावरील तुकडोजी चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सुधारित अष्टधातूचा पुतळा बसवावा, सध्या स्थितीतला पुतळा राष्ट्रसंतांच्या चेहऱ्याशी आणि शरीरयष्टी सुसंगत नाही. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनात स्वावलंबन, आत्मगौरव आणि समाजसुधारणेची बीजे रुजवली. त्यांच्या प्रेरणादायी कार्याला साजेसा असा सुधारित पुतळा नागपुरात उभारण्याची मागणी श्री गुरुदेव युवा मंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली आहे.

विशेषतः कर्करोगग्रस्त रुग्णांना प्रेरणा मिळावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलजवळ हा पुतळा बसवीण्या मागचा हेतु होता. तुकडोजी महाराजांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यांनीही या आजाराविरोधात लढा दिला होता. त्यामुळेच राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल येथे उभारण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समितीने लोकवर्गणीतून त्या पुतळ्यासाठी निधी उभा केला. परंतु, तो महाराजांच्या शरीरयष्टीप्रमाणे सुसंगत झाला नसल्याने बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला. शिल्पकार दयाराम चावडा यांनी अष्टधातूचा पुतळा तयार केला, परंतु तो महाराजांच्या चेहऱ्याशी आणि पेहरावाशी जुळत नसल्याने १९८७ मध्ये दुसऱ्या पुतळ्याला मान्यता मिळाली.१९९० मध्ये एका महिला शिल्पकाराने तयार केलेला पुतळा महापालिकेच्या ग्रेट नाग रोड येथील गोडाऊनमध्ये अडगळीत पडलेला आहे. त्याकाळी तो पुतळा बसवण्याचाही प्रयत्न झाला. परंतु जनविरोधामुळे तो देखील बसवण्यात आला नाही, असे ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितले.

महापालिकेच्या गोदामात पुतळा

थोर व्यक्तींचे पुतळे हे पूजेसाठी नसून ते प्रेरणादायी असतात. त्यामुळे आता महापालिकेने त्यांच्या ग्रेट नाग रोड येथील गोडाऊनमध्ये असलेला महाराजांचा पुतळा आणि मानेवाडा मार्गावर सध्या लावण्यात आलेला पुतळा या दोन्ही पुतळ्यांतील अष्टधातू वापरून चांगल्या शिल्पकाराकडून महाराजांचा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुतळा असा असावा

तुकडोजी महाराजांचे हजारो फोटो उपलब्ध आहेत. त्यापैकी एका फोटोतील प्रेरणादायी चेहरा निवडून नवा पुतळा तयार करावा. महाराजांचा नवीन पुतळा हा धोतर-बंगाली शर्ट पेहराव आणि हातात ग्रामगीता असलेला असावा. नागपूरच्या सौंदर्याकरणात भर घालणारा हा पुतळा स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन उभारावा, अशी श्री गुरुदेव युवा मंचाची मागणी आहे.