वर्धा : आख्यायिका असल्या तरी त्यांमागची श्रद्धा मात्र पिढ्यानंपिढ्या चालत असतेच. ती श्रद्धा ही पूजनीय तर असतेच पण भक्तीपोटी अंमलात पण आणल्या जाते. असेच श्रध्येचे हे विरळ उदाहरण. श्रीकृष्ण आर्वीलगत असलेल्या कौडण्यपुर येथून रुख्मिणीस पळवून गेल्याची कथा सर्वपरिचित. आजही या परिसरात त्या श्रद्हेतून यात्रा भरतात. श्रीकृष्ण येतांना ज्यांच्यासोबत आला तो समाज म्हणजे गवळी समाज. श्रीकृष्णाची गाय ती गौळवू. समुद्रमंथनात गवसलेली कामधेनू ती हीच अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण तर निघून गेला, आम्ही थांबलो वाघाच्या सावटात कामधेनूचे पालन करीत. असे गमतीदार बोल ऐकायला मिळतात. कारंजा तालुक्यातील हेटी, कुंडी, कन्नमवारग्राम हा परिसर दुभदुभत्याचा. जंगल परिसर म्हणून गोपालन मुख्य व्यवसाय.

गौळावू गायीचे तूप ३ हजार रुपये प्रती किलो. असे काय विशेष म्हणून या परिसरात काही गावांना भेटी दिल्यावर गौळावू गाईचे महात्म्य पटते. आयुर्वेद औषधीत वैद्य हेच तूप जालीम उपाय समजतात. पण त्याचे उत्पादनच होत नसल्याचे तथ्य पुढे आले. मुळात ही गायच दुर्मिळ झाल्याचे कानी पडले. पण अधिक शोध घेतल्यावर गावातील गळहाट कुटुंब या गाईचे पोशिंदे असल्याचे दिसून आले. त्यापुर्वीचा रंजक इतिहास आहेच. या गायीचे संगोपन व संवर्धन व्हावे म्हणून ब्रिटिशांनी याच हेटी परिसरात गौळावू संगोपन केंद्र स्थापन केले होते. ते आता दुर्लक्षित आहे. पशु संवर्धन खात्याकडे जबाबदारी असणाऱ्या या केंद्रात गायी आहेत पण एकही अधिकारी फिरकत नाही. नेमणूक कोकणात व जबाबदारी या केंद्राची, असा चक्रम प्रकार या केंद्राबाबत कां व कुणाच्या ईशाऱ्यावर होतात, याच्या सुरम्य चर्चा कानी पडतात.

एकीकडे या पौराणिक वारसा असलेल्या गौळावू गायीबाबत शासकीय स्तरावर अशी स्थिती असतांना दुसरीकडे हा वारसा उपजत मिळालेल्या गवळी समाजाने मात्र गायीचे जतन करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. या भागात गायी राहल्याच नाही असे कथन. मात्र अधिक माहिती घेतल्यावर हेटी या गावचे सुनील गळहट तब्बल ११० गौळवू गायी बाळगून असल्याचे दिसून आले. त्यांना राज्य पातळीवर असंख्य पुरस्कार लाभले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गाय पाहून प्रशस्ती दिली होती. गळहट यांच्या झोपडीवजा घरात वाकून शिरल्यावर प्रथम नजरेस पडते ते त्यांना प्राप्त पुरस्कार. ठेवायला जागा नाही, अशी स्थिती. ते म्हणतात ही गाय जतन करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. सुरवातीस काहीच नव्हत्या. कत्तलखान्यात गायी जात असल्याची माहिती मिळाली. तो ट्रक अडवून गायीची किंमत मोजली व गायी घरी आणल्या. त्यातलीच एक गौलावू आता पुरस्कारप्राप्त ठरली आहे. गत दहा वर्षात आकडा शंभरावर गेल्यात.

गळहट यांच्या हाकेसरशी त्या धावून येतात. युरोपीयन उभाट तोंडवळा व शुभ्र पांढरा रंग. वेगळेपण नजरेत भरते. त्या गाईचे १२० लिटर रोज दूध निघते. ते काटोल येथे विक्रीस जाते. गायी पोसण्यासाठी ते चाऱ्यावर व वन संपदेवर अवलंबून आहेत. वाघाचा वावर. आठवड्यात दोनदा तरी वाघ गोठ्यात फिरकतोच. आतापर्यंत २०, २५ गायी वाघाने फस्त केल्यात. पण उपाय नाही. शासनाने सहकार्य दिल्यास हे दुर्मिळ वाण कायम राहील, अशी भावना ते व्यक्त करतात. दुधाचे तूप कां नाही काढत, या प्रश्नावर ते म्हणतात की तुपाचा चढा दर कोणी देत नाही. आणि दुधास भाव नाही, अशी कोंडी आहे. घरचे तूप एका डब्बीत काढून ते देतात. चाखून बघाल, असा सल्ला दिल्यावर गोप्रेमी अजित लुनिया हे चार किलो तुपाचा ऑर्डरच देऊन टाकतात. विशिष्ट डेअरीचाच आग्रह शासन यंत्रणेकडून होतो. तिथेच दूध जाते. या दुधाची साठवणूक करीत त्यापोटी बक्कळ कमिशन उकलणारे पुढारी पण आहेच. परिसरातील गोपालक कसे पिळल्या जात आहेत, याच्या कथा ऐकायल्या मिळतात. पण हा गौळवू वंश वाढावा म्हणून शासनापेक्षा या कृष्ण वारसदारांचे प्रयत्न अधिक उठून दिसतात. मग जपणार कोण, हा गळहट यांचा प्रश्न निरुत्तर करून जातो.