लोकसत्ता टीम

नागपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडन म्हणजेच युके येथे साकारले जाणार आहे. त्‍यानिमित्ताने १५ एप्रिलला पंढरपूर ते लंडन आंतरराष्ट्रीय दिंडी बुधवारी नागपुरात पोहोचली. या दिंडीचे विष्‍णुजी की रसोई येथे पुष्‍पवर्षाव करून स्‍वागत करण्‍यात आले तेव्‍हा संपूर्ण परिसर विठुरायाच्‍या गजराने दुमदुमून गेला.

पुजा कुणाच्या हस्ते?

मुळचे नागपूरकर असलेले पण युकेत स्थायिक झालेले ऊद्योजक तुषार गडीकर व अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर साकारले जात असून अनिल खेडकर हे या पंढरपूर ते लंडन दिंडीचे नेतृत्व करीत आहेत. दिंडीतील पादुकांची मंदिर समितीचे भारतातील समन्‍वयक मोहन पांडे यांच्‍या हस्‍ते पूजा व आरती करण्‍यात आली.

उपस्थित कोण?

यावेळी सामाजिक कार्यकर्त्‍यां कांचन गडकरी, प्रवीण मनोहर, मिलींद देशकर, सुहास कुळकर्णी, ऊत्कर्ष खोपकर, मनीष शाह, नागपूरकर व मॅंचेस्टर, युके येथील ऊद्योजक संग्राम वाघ, गौरव शिर्शिकर, अनिल खेडकर, मनीष शहा, सुहास कुलकर्णी यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने विठ्ठलभक्‍त उपस्‍थ‍ित होते. कांचन गडकरी यांनी पादुकांचे दर्शन घेऊन हा योग विष्‍णू मनोहर व मोहन पांडे यांच्‍यामुळे जुळून आल्‍याचे सांगत त्‍यांचे आभार मानले.

संकल्पना काय?

अनिल खेडकर यांनी या पंढरपूर ते लंडन वारीमागची संकल्‍पना स्‍पष्‍ट केली. ते म्‍हणाले, श्री विठ्ठलाच्‍या पादुका ज्‍या सोनाराने घडवल्‍या त्‍यानेच या वारीतील पादुकादेखील घडवल्‍या असून त्‍या पंढरपुरातील श्री विठ्ठलाच्‍या स्पर्शाने पुनीत झालेल्‍या आहेत. पांडुरंग आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लंडन पोहोचवण्‍याचा वारीमागचा उद्देश असून लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे, असे ते म्‍हणाले.

स्वागत कसे?

धृपद गाडे यांने साकारलेल्‍या विठुरायाच्‍या पेंटिंगने सर्वांचे लक्ष वेधले. हे पेंटींग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिले जाणार आहे. प्रसिद्ध गायक गुणवंत घटवाई व हभप मृण्मयी कुलकर्णी यांच्‍या भक्तिगीत व भजनांनी वातावरण भक्तिमय होऊन गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवास कसा ?

१८ एप्रिल रोजी ही दिंडी भारतातून नेपाळमध्‍ये प्रवेश करेल व पुढे चीन, रशिया, यूरोप अशा २२ देशातून ७० दिवसात १८ हजार किलोमीटर एवढा प्रवास करत कारने या पादुका लंडन येथे पोहोचणार आहेत. त्याठिकाणी सहा एकर परिसरात विठ्ठल-रुक्मिणीच्या भव्य मंदिराचे काम सुरू झाले आहे.