वर्धा: सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याची भारतीय मानसिकता अद्याप कायम आहे. अनेक सामान्य कुटुंबाची हीच मोलाची पुंजी असते. पण ते खात्रीचे मिळेल याची खात्री होत नसल्याने शासनाने हॉलमार्क देणे सूरू केले. आता शुद्ध हॉलमार्क असलेले सोनं उपलब्ध असल्याने बनावटला थारा राहला नाही. पण चांदीसाठी हॉलमार्क लागू झाले नव्हते. ते लागू करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने घेतला आहे. मात्र तो ऐच्च्छीक राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल ही सुवर्णकारांची देशपातळीवरील संघटना आहे. त्या संघटनेशी चर्चा करीत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय ग्राहकांच्या हितासाठी चांगला ठरणार असल्याची प्रतिक्रिया आहे. गैरप्रकार होणार नाही. कमीतकमी शहरातील ग्राहक आता सोन्याचे हॉलमार्क दागिनेच मागू लागला आहे. मोठे व्यापारी तेच देतात. जे प्रामाणिक काम करणार नाही, ते विक्रेते बाहेर पडतील. खात्रीचेच दागिने मिळतील. व्यापाऱ्यांनी सोन्याचे हॉलमार्क देण्याची भूमिका स्वीकारली. आता चांदीचे पण हॉलमार्क दागिने देणे सूरू होईल. सुवर्णपेढीची साखळी पद्धतीचे शोरूम असणारे प्रसिद्ध एमटीडी ज्वेलर्सचे सौरभ ढोमणे म्हणतात की हा स्वागतार्ह निर्णय आहे.

यामुळे पारदर्शकता वाढेल. ग्राहक हॉलमार्क असलेले चांदीचे दागिने घेतील. यात एकच अडचण आहे. हॉलमार्क देणारे केंद्र मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे आमच्या संघटनेने चांदी हॉलमार्क देण्याची बाब ऐछीक ठेवावी अशी भूमिका घेतली. ती सरकारने मान्य केली. मात्र सोने हॉलमार्कचेच विकण्याचे बंधन आहे. सोने हॉलमार्क करून देणारी देशात २४० केंद्र आहेत. चांदीची नाहीत. किमान २ हजार अशी केंद्र अपेक्षित आहेत. ती सध्या नसल्याने चांदीबाबत अनिवार्य करण्यात आलेले नाही. पण पूढे ग्राहकांची मागणी वाढणार असल्याने सरकारला हॉलमार्क देणारी सेंटर्स वाढवावी लागतील, अशी अपेक्षा सौरभ ढोमणे व्यक्त करतात.

हॉलमार्क म्हणजे काय ? तर हे एक प्रमाणित चिन्ह आहे. भारतीय मानक ब्युरोतर्फे ते दिल्या जाते. त्यामुळे सोन्याची सत्यता व शुद्धता प्रमाणित होते. या चिन्हात एक अद्वितीय अल्फा न्युमेरेक कोड असतो. ज्यास हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन म्हणतात. हे चिन्ह तपासल्याने सोन्याच्या शुद्धतेची खात्री पटते. ग्राहक बनावट सोने खरेदीपासून वाचतात. ग्राहकांचा सोने विक्रेत्यावरील विश्वास वाढतो. त्यांना शुद्धतेची हमी मिळते. हॉलमार्कमुळे सोन्याच्या दागिन्यात होणारी फसवणूक टळते.