नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर नागपुरात कायदा व सुव्यवस्थेला नख लागू नये, अशी सामान्यांची धारणा असते. मात्र हेच शहर आता बेकायदेशीर कृत्यांचा अड्डा बनत चालले आहे. शहराचा मध्यवर्ती आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमुळे गजबजलेला सीताबर्डीचा परिसर देहव्यवसायाचेही केंद्र बनत आहे, का अशी शंका येत आहे.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सीताबर्डीच्या मुख्य बाजारपेठेतल्या मेट्रो स्पा अँड वेलनेस सेंटरवर छापा टाकत या देहव्यवसायाचा भंडाफोड केला. स्पा च्या आडून या ठिकाणी महिलांचा बाजार मांडला जात असल्याचे उघड झाले असून हा अड्डा चालविणारीही महिलाच आढळली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने येथून चार पिडीत महिलांची सुटका केली.

आरती अक्षय मरसकोल्हे ही गोपालनगरातील महिला या स्पा मध्ये देहव्यवसायासाठी महिलांना जागा उपलब्ध करून देत होती. गेल्या अनेक दिवसांपासून सिताबर्डीच्या मुख्य बाजारपेठेत ती स्पाच्या आडून हा गोरखधंदा चालवत होती. सामाजिक सुरक्षा पथकाने या स्पा मधून चार तरुणींची सुटका केल्यानंतर आरोपी आरती मरसकोल्हेला ताब्यात घेऊन सिताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

महिलाच चालवतात अड्डे

सामाजिक सुरक्षा पथकाने गेल्या काही दिवसांपासून देहव्यसायाविरोधात मोहिम उघडली आहे. यात आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. देह व्यवसायाचे हे अड्डे चालविणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. महिलाच महिलेकडून देहव्यवसाय करून घेतात हे समोर येत आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील लॉजवर छापा टाकत पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उजबेकिस्तानच्या पिडीतेची सुटका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातली आरोपी महिला रश्मि खत्री फरार झाली. त्यानंतर कोराडीत उच्चभ्रू वसाहतीतून पोलिसांनी तरुणाला सोडवत वंदना अनिल मेश्राम हीला अटक केली. त्या पूर्वीही वाठोडातल्या सरगम लॉजवर छापा टाकत पथकाने दोन पिडीतांची सुटका केली होती. त्रिमुर्तीनगर चौकातील मुस्कान वर्षा अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावरील ‘ओरीयन स्पा’वरवर छापा टाकत दोन तरुणींची सुटका करण्यात आली होती. हा अड्डाही पिंकी थापा नावाची महिला चालवत होती. या सगळ्या घटनांमध्ये महिलाच महिलेकडून देह व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले आहे.