यवतमाळ : आलिशान वाहनातून गांजा तस्करी करणाऱ्या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो गांजासह एकूण पाच लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज बुधवारी पहाटे आर्णी येथे दर्गा चौकात केली.
बाबाखान नूरखान (५८), सिकंदर खान हयात खान (५५), सय्यद मुजीब शहा सय्यद खामर शहा (५८), शेख जावेद शेख अहमद शेख (५६), सर्व रा. आदिलाबाद व अजर उर्फ अज्जू पठाण आजम पठाण (३२, रा. किनवट, जि. नांदेड), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एका आलिशान वाहनातून पाचजण नेर येथून दिग्रस मार्गे आर्णीकडे गांजा घेवून येत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने दर्गा चौकात बॅरीकेट्स लावून नाकाबंदी केली. आरोपींनी वाहन चालक गुंजन सोमजी घुले (रा. उमरीबाजार, किनवट) याचे वाहन भाड्याने घेतले होते. पाचहीजणांनी नेर येथून एका पॉकीटमध्ये गांजा घेतला.
हेही वाचा – कोल्हापूर दंगलीबाबत माजी गृहमंत्र्यांचे सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप
वाहनाची तपासणी केली असता, ५० हजार ५०० रुपये किंमतीचा पाच किलो ५०० ग्रॅम गांजा सापडला. या शिवाय दोन मोबाईल, पाच लाखांची कार असा एकूण पाच लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.