नागपूर : दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांच्या अधिवासांना कुंपण घालण्याची शिफारस केली होती, पण भारतातील तज्ज्ञांनी मात्र कुंपणाच्या शिफारशीला नाकारले आहे. ते वन्यजीव संरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असे केंद्राच्या उच्चस्तरीय समितीच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.

नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून भारतात २० चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या खुल्या जंगलात सोडलेल्या चित्त्यांपैकी काही चित्ते वारंवार उद्यानाच्या बाहेर जात आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील जे तज्ज्ञ भारतात चित्ता आणण्यासाठी मदत करत आहेत, त्यांनी शिकार, अधिवासाचे तुकडे होणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी चित्त्यांच्या अधिवासांना कुंपण घालण्याची शिफारस केली. मात्र, ते वन्यजीव संरक्षणाच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात आहे, असे नुकत्याच गठित करण्यात आलेल्या केंद्राच्या उच्चस्तरीय समितीचे म्हणणे आहे. कुंपणामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि आनुवंशिक देवाणघेवाणीत त्यामुळे अडथळे येऊ शकतात, असे या समितीचे म्हणणे आहे. त्यांनी नुकतीच कुनोला भेट दिली.

चित्त्यांच्या अधिवासाला कुंपण घालण्याचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. संरक्षित क्षेत्रांचे प्रादेशिक जाळे हे त्या क्षेत्राच्या राष्ट्रीय जाळय़ांमध्ये विलीन झाले पाहिजे. त्यामुळे वन्यजीवांच्या आनुवंशिक देवाणघेवाणीत अडथळे येणार नाहीत, असे मत चित्ता सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेश गोपाल यांनी व्यक्त केले.

गेल्या ५० वर्षांपासून आम्ही वाघांना हाताळत आहोत. मानव-वन्यजीव संघर्ष काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही चित्तादेखील हाताळू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. तर कुंपण नसलेल्या चित्त्यांच्या राखीव जागेत हा प्रयोग यशस्वी झालेला नाही, असे दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दक्षिण आफ्रिकेत हा प्रयत्न अनेकदा अपयशी झाला. कुनो राष्ट्रीय उद्यानातील जागा आणि चित्त्यांना लागणारी शिकार पुरेशी नसल्याबद्दल यापूर्वीदेखील अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. अलीकडेच न्यायालयानेदेखील यावर ताशेरे ओढले.

चित्ता आणि मनुष्य यांच्यातील संघर्षांचे निराकरण करताना राजेश गोपाल यांनी चित्त्यांसाठी असुरक्षित क्षेत्र ओळखण्यास मदत करण्यासाठी ‘जीआयएस’ आधारित ‘लँडस्केप’ विखंडन याचा अभ्यास करण्यात येईल, असे सांगितले. तसेच चित्ते मानवी वसाहतीत प्रवेश करू शकतात आणि त्यासाठी आम्ही तयार राहू, असे राजेश गोपाल या भेटीदरम्यान म्हणाले. दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानातील खुल्या जंगलात दोन मादी चित्त्यांसह आणखी सात चित्ते जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत सोडले जातील.