नागपूर : दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर रेल्वे विभागातील शालीमार यार्डचे आधुनिकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम १३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीत सिग्नलिंग प्रणालीचे नूतनीकरण, ट्रॅक बदल, यार्डमधील लाईन व्यवस्थापन सुधारणा आणि आधुनिक सुविधा उभारण्याची कामे हाती घेण्यात येतील. या कामामुळे काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल, काही गाड्या रद्द राहतील तर काही गाड्या मध्येच समाप्त होतील.
रद्द होणाऱ्या गाड्या
एलटीटी–शालीमार एक्सप्रेस ही गाडी १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २२ आणि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रद्द राहील., शालीमार–एलटीटी एक्सप्रेस ही गाडी १३ ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चालणार नाही. एलटीटी–शालीमार एक्सप्रेस ही गाडी १२, १३ आणि १९ नोव्हेंबर २०२५ रोजी रद्द राहील. शालीमार–एलटीटी एक्सप्रेस ही गाडी १४, १५ आणि २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रद्द राहील.
मध्येच समाप्त होणाऱ्या गाड्या :
एलटीटी–शालीमार एक्सप्रेस ही गाडी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सांतरागाछी स्टेशनपर्यंतच धावेल. सांतरागाछी ते शालीमार हा मार्ग रद्द राहील. हीच गाडी २० नोव्हेंबर २०२५ रोजी १२१०२ सांतरागाछी–एलटीटी एक्सप्रेस म्हणून मुंबईकडे रवाना होईल. पोरबंदर–शालीमार एक्सप्रेस ही गाडी १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सांतरागाछीपर्यंतच धावेल आणि सांतरागाछी–शालीमार हा भाग रद्द राहील. ही गाडी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सांतरागाछी–पोरबंदर एक्सप्रेस म्हणून परतीचा प्रवास करेल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या कालावधीत प्रवासाची योजना करताना गाड्यांच्या वेळापत्रकाची व रद्दीकरणाची खात्री करून घ्यावी. आधुनिकीकरणानंतर शालीमार यार्डमधील गाड्यांची हालचाल अधिक वेगवान, सुरक्षित व कार्यक्षम होणार असून प्रवाशांना दीर्घकालीन सुविधा मिळतील, असे दक्षिण पूर्व रेल्वेने स्पष्ट केले आहे.
