नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीसाठी ८ प्रभाग आहेत. यातील तीन प्रभाग सोडल्यास इतर सर्व प्रभागात कामठी, दक्षिण-पश्चिम, मध्य आणि पूर्व नागपूर विधानसभेतील वस्त्या समाविष्ट आहेत. येथे विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी अटीतटीची लढत होत असली तरी महापालिकेत मात्र येथील नागरिकांचा कल भाजपकडेच राहत असल्याचे आजवरचे चित्र आहे.

या मतदारसंघात प्रभाग क्रमांक १७,२८, २९, ३०, ३१, ३२, ३३ आणि ३४ असे आठ प्रभाग आहेत आणि २५ नगरसेवक आहेत. त्यापैकी दोन काँग्रेस, दोन शिवसेनेचे आहेत. उर्वरित सर्व जागा भाजपकडे आहेत. प्रभाग क्रमांक ३०, ३१ आणि ३२ हे केवळ तीन प्रभाग पूर्णपणे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात आहेत.

प्रभाग १७ मध्ये मध्य आणि दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा बहुतांश भाग आहे. येथे काँग्रेसची एक जागा आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये पूर्व नागपूरमधील वस्त्यांचा समावेश आहे. या प्रभागाचा एक भाग पूर्व नागपूरचा आहे. येथे तीन दक्षिण नागपूरच्या जागा आहेत. त्यापैकी दोन शिवसेनेकडे आणि एक भाजपकडे आहे. प्रभाग २९ मध्ये कामठी विधानसभा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक ३० मध्ये तीन भाजप आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक ३१ आणि ३२ मध्ये भाजपने सर्व जागा जिंकल्या होत्या. प्रभाग क्रमांक ३३ आणि ३४ मध्ये दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग जोडण्यात आला आहे. ३३ मध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

 उर्वरित दोन्ही प्रभागात भाजपचे नगरसेवक आहेत. अशाप्रकारे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत दोन शिवसेना आणि दोन काँग्रेसचे नगरसेवक वगळता उर्वरित सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. गेल्या दोन्ही विधानसभेत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. २०१९ मध्ये भाजपचे मोहन मते यांना ८४ हजार ३३९ आणि काँग्रेसचे गिरीश पांडव यांना ८० हजार ३२६ मते मिळाली होती. केवळ ४ हजार मतांच्या अंतराने भाजपने दक्षिणचा गड राखला. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत मोहन मते यांना १ लाख १७ हजार ५२६ मते मिळाली आणि गिरीश पांडव यांनी १ लाख १ हजार ८६८ घेतली. या निवडणुकीत देखील मतांचा अंतर फार नाही. मात्र, महापालिका निवडणुकीत या मतदासंघात सातत्याने काँग्रेसची पिछेहाट होताना दिसून येत आहे. दक्षिणचा गड परत मिळवण्यासाठी काँग्रेसने आता मतदार यादीचा अभ्यास करण्याची सूचना बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

२५ पैकी २१ जागा भाजपकडे

२०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपुरात भाजप-काँग्रेसच्या उमेदवारात मतांचे फारसे अंतर नाही. परंतु २०२७ च्या महापालिका निवडणुकीत दक्षिण नागपुरातील २५ नगरसेवकांपैकी २१ जागा भाजपने जिंकल्या होत्या.