लोकसत्ता टीम

अकोला : यंदा पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या नुकसान भरपाईपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सोयाबीन या अधिसूचित पीकासाठी ५२ महसूल मंडळांतील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के अग्रीम एका महिन्याच्या आत जमा करावा, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी बी. वैष्णवी यांनी जारी केली. जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली. एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने एका महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा-फडणवीस रमले दहीहंडीत, म्हणाले “श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोट तालुक्यातील अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा बाजार, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा, माळेगाव बाजार, हिवरखेड, अडगाव बु., पाथर्डी, पंचगव्हाण, बाळापूर तालुक्यातील बाळापूर, पारस, व्याळा, वाडेगाव, उरळ, निंबा, हातरूण, पातूर तालुक्यातील पातूर, बाभूळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती, अकोला तालुक्यातील अकोला, घुसर, दहिहंडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव, शिवणी, पळसो, सांगळूद, कुरणखेड, कौलखेड, तसेच बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी, महान, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा आणि मूर्तिजापूर तालुक्यातील मूर्तिजापूर, हातगाव, निंभा, माना, शेलू बाजार, लाखपुरी, कुरूम, जामठी बु. या ५२ महसूल मंडळांत ही अधिसूचना लागू होईल. ज्या महसूल मंडळांत चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात गत सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.