नागपूर : पाकिस्तानसाठी काही भारतीय नागरिकांकडून हेरगिरी केल्याचे प्रकरण समोर आले. यासाठी हरियाणातील ज्योती मल्होत्रास अटक करण्यात आली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी काही वर्षांपूर्वी नागपूरमधून एक अभियंता आणि पुणे येथे एका शास्त्रज्ञास अटक करण्यात आली होती.
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. बावचाळलेल्या पाकिस्तानने आगळीक करण्याचा प्रयत्न केला, भारताने त्यास चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर शस्त्रसंधीची घोषणा झाली आणि काही दिवसात हेरगिरीप्रकण समोर आले.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी काही लोकांना अटक केली. यामध्ये हरियाणाची ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राचा देखील समावेश आहे. ज्योती मल्होत्राच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद माहिती सापडली आहे. ज्योतीच्या विरोधात ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १५२ अंतर्गत (भारताचे सार्वभौमत्व, ऐक्य आणि अखंडतेला धोका निर्माण करणारे कृत्य केल्याबद्दल) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अटक झाल्यापासून ज्योतीच्या पाकिस्तान प्रवासाची खूपच चर्चा होते आहे. याशिवाय तिचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या डिनर पार्टीचा हा व्हिडिओ आहे.
यापूर्वी डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याच्यावर ‘पाकिस्तान गुप्तचर संघटने’च्या एका एजंटसह व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क असल्याचा आरोप आहे. त्याने गुप्त माहिती उघड केल्याबद्दल महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ३ मे २०२३ (पुणे) अटक केली होती. तर नागपूरमधील एका न्यायालयाने ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माजी अभियंत्या निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला २०१८ मध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सी आयएसआयला गुप्त माहिती देत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर आता हरियाणाच्या हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाची महिला युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे.
कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यावेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते. चौकशीत कुरुलकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल राज्य दहशतवादविरोधी पथकातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता.
निशांत अग्रवाल याने नेहा शर्मा आणि पूजा रंजन या दोन फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून संशयित पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आला होता. इस्लामाबादमधून चालवली जाणारी ही खाती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था चालवतात असे मानले जाते. त्याच्या लॅपटॉपमधून अत्यंत गोपनीय फाइल्स सापडल्या आहेत. याशिवाय एक सॉफ्टवेअरही सापडले, ज्याद्वारे लॅपटॉपमध्ये असलेली संवेदनशील तांत्रिक माहिती परदेशात आणि समाजकंटकांना पाठवली जात होती.