जुन्या नोटा स्वीकारण्याची ‘एसटी’ला परवानगी आहे. परंतु त्यांच्याकडे या बदल्यात प्रवाशांना देण्याकरिता सुटे नसल्याने सर्वत्र गोंधळ उडून प्रवासी व वाहकांचे वाद वाढले आहे. या कारणाने प्रवासी संख्या घटली आहे. यामुळे ‘एसटी’ला आर्थिक फटका बसत असून प्रवाशांचाही मनस्ताप वाढला आहे.

राज्यात सर्वसामान्य प्रवाशांच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून ‘एसटी’कडे बघितले जाते. एसटी महामंडळात रोज लक्षावधी प्रवासी प्रवास करीत असून त्यांना अद्ययावत सेवा देण्याकरिता हजारो कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया केल्या आहेत.  नागपूर जिल्ह्य़ात ‘एसटी’च्या ५९२ बसेस असून रोज २ हजार ५०० ते ३ हजार फेऱ्या राज्याच्या विविध भागात सुरू असतात. राज्यातील मागास, दुर्गम व आदिवासी बहुल भागातही सामाजिक बांधीलकी म्हणून या बसेस तोटय़ात असतांनाही नित्याने फेऱ्या करण्यासह या बसच्या प्रत्येक प्रवाशांना विम्याचे कवच महामंडळाकडून दिले जाते. प्रशिक्षित चालकांसह एसटीच्या अपघाताची संख्याही कमी असल्याने या संस्थेच्या बसमध्ये प्रवासाला प्रवाशांकडूनही पसंती दिली जाते.

[jwplayer MrhIn5NN]

दिवाळीच्या काळात ‘एसटी’च्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली होती. ही वाढ लग्नाचा काळ असल्याने अद्यापही कायम राहणे अपेक्षित होती. परंतु केंद्र सरकारने ८ सप्टेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून अचानक देशात ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतल्याने एसटीच्या प्रवाशांवरही त्याचा परिणाम झाला आहे. या नोटा ‘एसटी’ला स्वीकारण्याची परवानगी असली तरी प्रवाशांना परत देण्याकरिता सुटे पैसे नसल्याने सगळ्याच बसेसमध्ये प्रवासी- वाहक वाद वाढले आहेत.

निश्चितच त्याचा एसटीच्या उत्पनावरही परिणाम झाला आहे. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये सरासरी ५५ ते ६० टक्के प्रवासी भारमानअसते. ही टक्केवारी दिवाळी वा लग्न समारंभाच्या काळात जास्त असते. परंतु गुरुवारी दुपारी एसटीकडे केवळ ५४.१३ टक्केच भारमाननोंदवण्यात आले. गेल्यावर्षी दिवाळी विलंबाने असल्यावरही या दिवशी भारांक हा ६०.३४ टक्के होता. तेव्हा या वर्षी अपेक्षित प्रवाशांची वाढ नोंदवली नसल्याचे दिसत आहे. आकडय़ावरून प्रवासी घटल्याचे दिसत नसले तरी नागपूर जिल्ह्य़ातच एसटीला रोज लक्षावधींचा फटका बसत आहे. प्रशासनाकडून मात्र उत्पन्नावर फारसा परिणाम झाला नसल्याचा दावा केला जात आहे.

नोटाबंदीचा फारसा परिणाम नाही

‘एसटी’ला जुन्या पाचशे, हजारांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी आहे. त्यामुळे एसटीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. वाहकांसोबत प्रवाशांचे वाद वाढले असले तरी कोणत्याही प्रवाशाला त्रास व्हावा असा प्रकार कोणत्याही कर्मचाऱ्यांनी केल्याच्या तक्रारी नाही. एसटीची प्रवासी संख्या काही प्रमाणात घटली असली तरी दिवाळीनंतर तशीही प्रवाशांची संख्या कमी होत असल्याचे दिसते.

सुधीर पंचभाई , विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर

[jwplayer cZl5tDhf]