महेश बोकडे
नागपूर : करोना काळात प्रवासी वाहतुकीवर झालेला परिणाम बघत एसटी महामंडळाने १ मे २०२० पासून महाकार्गोची (मालवाहतूक) सेवा सुरू केली. परंतु कर्मचारी संपाच्या कालावधीत ही सेवा ठप्प पडल्याने महामंडळाचे ३५ कोटींचे नुकसान झाले आहे. आता कर्मचारी सेवेवर परतले, परंतु पूर्वीच्या तुलनेत या सेवेला प्रतिसाद कमी असल्याने अधिकाऱ्यांना ग्राहक मिळवण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागत आहे.
करोना काळात उत्पन्न घटल्याने जुन्या एसटी बसेसला मालवाहू ट्रकमध्ये परावर्तीत करण्यात आले. २१ एप्रिल २०२२ पर्यंत एसटीकडे असे तब्बल १,१२४ मालवाहू ट्रक आहेत. दरम्यान, कर्मचारी संपामुळे एसटीची मालवाहतूक तब्बल साडेपाच महिने ठप्प होती. प्रवासी सेवा विस्कळीत झाल्याने एसटी प्रशासनाला मालवाहतुकीकडे लक्ष देणे शक्य नव्हते. आता कर्मचारी कामावर परतून पंधरा दिवसांहून जास्त कालावधी झाला आहे. त्यानुसार मालवाहतूकही सुरू झाली. परंतु या सेवेला पूर्वीच्या तुलनेत मागणी खूपच कमी आहे. नागपुरात पूर्वी रोज १५ वाहनांतून विविध साहित्याची वाहतूक होत होती. परंतु आता निम्मीच मागणी असल्याचे एसटी महामंडळाचे नागपुरातील विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले. पुढे ही मागणी निश्चितच वाढण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हीच स्थिती राज्यातील इतरही भागात कमी-अधिक प्रमाणात सारखीच असल्याचे वेगवेगळय़ा भागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाकार्गोची स्थिती
(१ मे २०२० ते २० एप्रिल २०२२)
मालवाहू गाडय़ांची संख्या- ११२४
एकूण फेऱ्यांची संख्या- १,५१,४९१
एकण उत्पन्न- ९२ कोटी ५३ लाख ५० हजार ३३७
एकूण किलोमीटर- ३६ लाख २२ हजार ५६८

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St mahakargo strike service passenger transport st corporation freightstaff amy
First published on: 07-05-2022 at 10:22 IST