महेश बोकडे

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांनी कामगारांकडून मोठी रक्कम गोळा केल्याचाही पोलिसांचा दावा आहे. या दाव्यानंतर लगेच एसटी कामगारांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ही रक्कम आम्ही स्वखुशीने दिल्याचे अर्ज फिरू लागले आहेत. ते लवकर भरण्याचे आवाहन केले जात असून हा अर्ज तयार केला कुणी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळय़ा व्हॉट्सअ‍ॅप समूहावर अ‍ॅड. सदावर्ते यांना ३०० रुपये स्वखुशीने दिल्याचा कोरा अर्ज फिरत आहे. त्यात स्वाक्षरी करणाऱ्याचा रकाना कोरा सोडण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव व विभाग लिहून हा अर्ज लवकर भरण्याचे आवाहन केले जात आहे. हा अर्ज न्यायाधीशांच्या नावाने लिहायला लावला जात असून त्यात प्रतिलिपी पोलीस ठाणेदाराच्या नावाने आहे. परंतु पोलीस ठाणे कोणते, याचा उल्लेख नाही. अर्जाच्या मजकुरात ‘आमच्या साहेबांना पैशांसाठी दोषी धरण्यात येऊ नये,’ अशी विनंतीही करण्यात आली आहे. अ‍ॅड. सदावर्ते कोठडीत असताना हा अर्ज तयार करून देणारे कोण, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

कामगारांनी वैयक्तिक पातळीवर कोणाला किती पैसे दिले वा कशासाठी दिले, या गोष्टीशी एसटी महामंडळाचा संबंध नाही. हे प्रकरण पोलिसांकडे असून ते त्यांच्या पातळीवर त्याचा तपास करतील. परंतु आंदोलकांनी लवकर सेवेवर यावे. जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. 

– शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ, मुंबई.

विलीनीकरण होईल असे स्वप्न दाखवत आंदोलकांकडून काहींनी मोठय़ा प्रमाणात पैसे गोळा केले. हा संप निकाली निघू नये यासाठीही कामगारांची माथी भडकवण्यात आली. आता अ‍ॅड. सदावर्ते यांना अटक झाल्यावर हे पैसे गोळा करणाऱ्यांचे घोटाळे व पाठीमागे असलेल्यांचे पितळ उघडे पडू शकते. त्यामुळे असे अर्ज भरून घेतले जात आहेत. परंतु कामगार असे अर्ज करू शकत नसल्याने ते तयार कुणी केले, त्यामागे कोण आहे व त्याचा उद्देश काय, हे नागरिकांना कळायला हवे. 

– मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)