महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय मानक संस्थेने (ब्युरो) देशभरात १० हजार हायस्कूल-महाविद्यालयांत ‘स्टॅन्डर्ड क्लब’ स्थापन करण्याचे ठरवले आहे. या क्लबमधील प्रत्येकी १ शिक्षकासह ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले जाईल. हे विद्यार्थी कालांतराने घरोघरी औद्योगिक उत्पादनाच्या दर्जा तपासणीच्या माहितीबाबत जनजागृती करतील.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याच्या अखत्यारित असलेल्या भारतीय मानक संस्थेने जून- २०२१ दरम्यान पथदर्शी प्रकल्प म्हणून हा उपक्रम सुरू केला. मात्र, करोनामुळे जनजागृतीवर बऱ्याच मर्यादा आल्या. त्यामुळे पहिल्या टप्प्यात देशातील १ हजार हायस्कूल- महाविद्यालयात जनजागृतीचे लक्ष्य होते. परंतु २०२२ मध्ये आता १० हजार शाळेपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार या शाळेत प्रत्येकी एक स्टॅन्डर्ड क्लब स्थापन करून तेथील प्रत्येकी एका शिक्षकाला प्रशिक्षीत केले जात आहे.

प्रशिक्षित शिक्षकाकडून कालांतराने संबंधित शाळेतील क्लबच्या ३० विद्यार्थी सदस्यांना प्रशिक्षित केले जाईल. मग हे विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, शेजारील नागरिक, नातेवाईकांपर्यंत औद्योगिक उत्पादनाच्या दर्जा तपासणीची माहिती पोहचवतील. त्यामुळे कमी दर्जाच्या वस्तूंबाबत सामान्यांना माहिती मिळेल आणि भविष्यात निम्न दर्जाच्या वस्तूंपासून सामान्यांची सुरक्षा होण्यास मदत होईल. विदर्भातील अकरा जिल्ह्यांसह नांदेड, हिंगोली अशा एकूण १३ जिल्ह्यांचाही यात समावेश आहे.

सुधारणेबाबत सूचना स्वीकारणार

देशभरातील दहा हजार शाळा- महाविद्यालयांत स्टॅन्डर्ड क्लब स्थापन झाल्यावर भारतीय मानक संस्थेकडून दर्जा तपासणीबाबत सूचनाही स्वीकारल्या जातील. यापैकी नागरिकांसाठी फायद्याच्या ठरू शकणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धा घेऊन पाच जणांचा गौरव ‘‘नागपुरात ८३ तर देशभरात १० हजार स्टॅन्डर्ड क्लब स्थापन झाल्यावर देशातील प्रत्येक क्लबमधील प्रत्येकी ५ विद्यार्थी निवडून औद्योगिक उत्पादनाच्या दर्जाच्या माहितीबाबत राष्ट्रीय स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना केंद्र सरकारकडून पुरस्कृत करण्याचा भारतीय मानक संस्थेचा प्रयत्न आहे.

– पीयूष वासेकर, संयुक्त संचालक (वैज्ञानिक-ड), भारतीय मानक संस्था, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Standard club schools colleges awareness quality industrial products initiative indian standards organization ysh
First published on: 13-05-2022 at 00:02 IST