scorecardresearch

करोना काळात राज्यातून जेई, एईएस, चंडीपुरा बेपत्ता !: माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवलेल्या या माहितीनुसार, राज्यात २०१९ मध्ये जपानी मेंदूज्वरचे ३१ रुग्ण आढळले होते.

|| महेश बोकडे

माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

नागपूर : राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून आजपर्यंत जपानी मेंदूज्वर (जे. ई.), इतर मेंदूज्वर (ए. ई. एस.), चंडीपुरा या आजाराचे रुग्णच आढळले नसल्याचे पुण्याच्या आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या आकडेवारीतुन समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवलेल्या या माहितीनुसार, राज्यात २०१९ मध्ये जपानी मेंदूज्वरचे ३१ रुग्ण आढळले होते. यापैकी १ रुग्णाचा मृत्यू झाला. ही संख्या २०२० मध्ये २ रुग्णावर आली. यापैकी एकाचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये एकही रुग्ण आढळला नाही. इतर मेंदूज्वरचे (ए. ई. एस.)चे राज्यात २०१९ मध्ये १०७, २०२० मध्ये १२ रुग्ण आढळले. परंतु एकाचाही मृत्यू नाही. २०२१ मध्ये एकही रुग्ण आढळला नाही. २०१९ मध्ये चंडीपुराच्या १ रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये एकही रुग्ण आढळला नाही. या आजाराचे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रामुख्याने विदर्भाचा समावेश आहे, हे विशेष.

माकडताप, स्क्रब टायफसचेही रुग्ण घटले

राज्यात २०१९ मध्ये माकडतापाच्या (के.एफ डी.) आढळलेल्या ८२ रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये १६ रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये ७ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला. राज्यात २०१९ मध्ये स्क्रब टायफसचे ९ रुग्ण आढळले तरी एकही मृत्यू नाही. २०२० मध्ये ७ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये ५ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णांची संख्याही कमी झालेली दिसत असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Statistics right to information je aes chandipura disappeared from the state during the corona period akp

ताज्या बातम्या