भंडारा : अहो ! भुसे काका, कमी पटसंख्येमुळे आमचे शिक्षक कमी होणार असे कळले. वर्गाला शिक्षकच नसेल तर आम्ही शाळा सोडायची काय?, गावात शाळाच नसेल तर आम्ही कुठे शिकायचं?,

शिक्षक कमी करून आमचे शिक्षण थांबवू नका. तुम्ही आमच्या हिताचा नक्कीच विचार कराल, असा विश्वास आहे, अशी भावनिक साद घालणारे पत्र जिल्हा परिषद शाळा अंबाडीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पाठविले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी शाळा बंद करून खेड्या-पाड्यातील गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे दि. १५ मार्च रोजी निर्गमित झालेला संचमान्यतेबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्रे पाठवून आमचे शिक्षक कमी करून शाळा बंद करू नका, गावातील शिक्षण वाचवा, शाळा टिकवा, विद्यार्थी घडू द्या अशी मागणी या पत्रातून केली आहे. भंडारा जिल्ह्यातील जवळपास १०० ते १५० जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे पत्र लिहून शिक्षणमंत्र्यांना शाळा आणि शिक्षण वाचविण्यासाठी हाक दिली.

काय आहे पत्रात …

* ‘अहो ! भुसे काका, कमी पटसंख्येमुळे आमचे शिक्षक कमी होणार असे कळले. वर्गाला शिक्षकच नसेल तर आम्ही शाळा सोडायची काय?, गावात शाळाच नसेल तर आम्ही कुठे शिकायचं?,

* शिक्षक कमी करून आमचे शिक्षण थांबवू नका. तुम्ही आमच्या हिताचा नक्कीच विचार कराल, असा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आपला लाडका विद्यार्थी आपली लाडकी विद्यार्थिनी.’ असे पत्र पाठविले.

* आमचे गावातच शिक्षण होण्यासाठी शाळा राहू द्या. गावातील शाळा बंद झाल्यास बाहेरगावच्या शाळेत जायला त्रास होईल. आमचे शिक्षण बंद होईल. शाळेला पुरेसे शिक्षक द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

” सरकारची शैक्षणिक नीती विद्यार्थ्यांच्या भविष्याची अधोगती करणारी आहे. गोरगरीब व बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी शाळा, विद्यार्थी आणि शिक्षणविरोधी निर्णय घेतले जात आहेत. शासन स्तरावर मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गावातील नागरिक तसेच समाजमाध्यमांनी लोकचळवळीचा सनदशीर मार्ग म्हणून मराठी शाळा वाचविण्यासाठी जनआंदोलन करण्याची गरज आहे. मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राथमिक संघ. भंडारा