‘सीटीपीएल’च्या संचालिका स्नेहल शिंदे यांची माहिती; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : शैक्षणिक व्यवस्थेतील शेकडो उणिवांमुळे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विशेषत: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक ज्ञानच मिळत नाही आणि कुठलीही खासगी कंपनी अप्रशिक्षित कर्मचारी कामावर ठेवायला धजावत नाही. परिणामी, आज विदर्भातील ८५ टक्के विद्यार्थी लाखो रुपये खर्चून मोठय़ा कंपन्यांमध्ये प्रशिक्षण शिकवणी घेण्यासाठी पुणे, हैदराबाद आणि बंगळुरू गाठतात. मात्र, येथेही हवे तसे प्रात्यक्षिक ज्ञान मिळत नसल्याने शेवटी  नैराश्येच्या गर्तेत जातात, असे मत  क्लेरिक टेक्नॉलॉजी प्रा.लि.च्या(सीटीपीएल) संचालिका व समुपदेशक स्नेहल शिंदे यांनी व्यक्त केले. विदर्भातील तरुणांनी बाहेरच्या कंपन्यांचा मोह सोडून स्थानिक कंपनींकडून आवश्यक ते प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतल्यास त्यांना दर्जेदार कंपनीत रोजगार मिळू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी नोकरीच्या नावावर तरुणांची होणारी फसवणूक, मानसिक नैराश्य आणि गुणवत्तापूर्ण नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांच्या कंपनीचे प्रयत्न यावर चर्चा केली. यावेळी क्लेरिक टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे(सीटीपीएल) संचालक सुहास शिंदेही  उपस्थित होते. स्नेहल शिंदे यांनी सांगितले की, नेदरलँडमधील सॉफ्टवेअर क्षेत्रातील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून आपल्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा उपयोग आपल्या क्षेत्रातील युवकांना व्हावा या उद्देशाने २०११ मध्ये नागपुरात क्लेरिक टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीची स्थापना केली. या माध्यमातून सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करीत असताना विदर्भातील तरुणांच्या हाताला रोजगार आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्याचा उद्देशही साध्य करता आला.  आपल्याकडील युवक हे अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाले की नोकरी नाही म्हणून ओरडत असतात. मुलगा अभियंता झाला की, पालकांच्याही अपेक्षा उंचावतात. या सर्व अपेक्षांच्या ओझ्यामध्ये दबलेले हजारो युवक पुढे नैराश्याचा सामना करताना दिसतात. खासगी क्षेत्रातील कुठलीही कंपनी ही नफ्याचा अधिक विचार करते. तीनशे ते चारशे कोटींच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या कुठल्याही कंपनीली  कुशल कर्मचारीच हवे असतात. पुस्तकी ज्ञान घेणाऱ्या  युवकांना नोकरी तरी कोण देणार? अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही उद्योगांत काम केल्याचा अनुभव नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाच मिळत नसल्याने कंपनी त्यांना नोकरी देत नाही. परिणामी नैराश्यात गेलेली विदर्भातील बहुतांश मुले ही पुणे, हैदराबाद अशा शहरांमध्ये लाखो रुपये खर्च करून प्रशिक्षण शिकवणी लावतात. मात्र, कंपन्यांनीही या मुलांची दुखती नस ओळखली असल्याने बीपीओ केंद्रामध्ये दहा-बारा हजारांवर या तरुणांना राबवून घेतले जाते. अशा तरुणांच्या हाताला रोजगार देणे आणि त्यांना दर्जेदार कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून क्लेरिक टेक्नॉलॉजी प्रा.लि. प्रयत्नशील असल्याचे स्नेहल शिंदे यांनी सांगितले.

..तर नोकऱ्या देणाऱ्यांच्या रांगा लागतील

बेरोजगारी, नोकरी मिळत नाही अशी सारखी ओरड होत असते. मात्र हे साफ खोटे आहे. शेकडो नोकऱ्या पडल्या आहेत. मात्र, अभाव आहे तो आवश्यक असणाऱ्या गुणवत्तापूर्ण कुशल कामगारांचा. त्यामुळे स्वत:मध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता निर्माण केली तर नोकरी देणाऱ्यांच्या रांगा लागतील, असा विश्वासही स्नेहल शिंदे यांनी व्यक्त केला.

दीड हजारांवर तरुणांना रोजगार

क्लेरिक टेक्नॉलॉजी प्रा.लि.च्या माध्यमातून कुठल्याही शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या दहा वर्षांमध्ये दीड हजारांवर विद्यार्थ्यांना देश-विदेशातील विविध कंपन्यांमध्ये ३ लाख ते ५० लाखांपर्यंतच्या वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळाल्याचे सुहास शिंदे यांनी सांगितले. चांगल्या प्रशिक्षणाशिवाय उद्योगांमध्ये तुमची किंमत नाही. त्यामुळे आमच्या कंपनीमध्ये व्यक्तिमत्त्व विकासापासून त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यावर कायम भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students taking professional education do not get physical training knowledge snehal shinde dd
First published on: 02-03-2021 at 03:23 IST