नागपूर : ससून रुग्णालयातून पसार झालेला, अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत, तर सत्ताधाऱ्यांकडून ते परतवून लावले जात आहेत. अशातच नागपुरात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी दिलेली प्रतिक्रिया नव्या राजकीय वादाला तोंड फोडणारी ठरण्याची चिन्हे आहेत. अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्याने आपल्याला धमकावले जात असल्याचे म्हटले आहे.

नागपुरात महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटनासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे नव्हे तर राज्याचे नेते आहेत. मी ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्यामुळे फडणवीस मला धमकावत आहेत. बोलणाऱ्याची तोंड बंद होतील, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री असलेल्या फडणवीसांना शोभणारे नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – वर्धा : वीस वर्षापासून ‘येथे’ ना वीज, ना नळ, ना शौचालय…

महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होऊ नये म्हणून…

गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांना राज्यातील जनतेला उत्तर देणे बाध्य आहे. राज्याचा ‘उडता पंजाब’ होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. इशारे ड्रग्ज माफियांना द्या मला नको, असे सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितले. आयुष्यभर कायद्याच्या चौकटीत राहून कार्य केले आहे, त्यामुळे अशा धमक्यांना मी घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – भाजपच्या बालेकिल्ल्यात आज अंधारेंची तोफ धडधडणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंभूराज देसाईंसोबत वैयक्तिक वैर नाही

शंभूराज देसाईंसोबत माझं वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या खात्याशी संबंधित जर विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाईंकडे आहे. तो विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. मी जे काल बोलले, त्यामधून मी एकही शब्द मागे घेणार नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.