लोकसत्ता टीम
नागपूर: ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी नैतिकता म्हणून चौकशीला सामोरे जाताना गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला तशी नैतिकता म्हणून पत्नीची चौकशी होताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत का? यावर आधी ज्ञान पाजळावे मग इतरांना सांगावे, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारे नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. गृहमंत्र्यांच्या घरात सहा वर्षे अमृता फडणवीसांची मैत्रीण बनून असणारी एक बाई काय करत होती हे कुठल्या तोंडाने सांगत आहे. हे एका अर्थाने गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्या अनेक ठिकाणी सभा घेत असताना मी कधीच चोर म्हणून उच्चार करत नाही. पण समोर बसणारे प्रेक्षक जेव्हा ५० खोके एकदम ओकेची घोषणा देतात तेव्हा तुम्ही कुणाकुणाला अटक कराल, असा सवाल त्यांनी केला. तुम्ही खोक्यांचा व्यवहार केला, आता हे माझ्या मते गावागावात आणि घराघरात माहिती झाले आहे. हे आम्ही सांगायची गरज नाही.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असलेले आमदार बच्चु कडू सांगतात की कुठेही लग्नाला गेलो तर तिकडचे वऱ्हाडीसुद्धा खोके वाले लोक आले म्हणून आम्हाला बोलतात. त्यामुळे कुणाकुणाला अटक करणार आहात, असेही त्या म्हणाल्या.