विभागात दगावलेल्यांची संख्या ३४ वर

पूर्व विदर्भाच्या काही भागात भर उन्हाळ्यात डोक वर काढणाऱ्या ‘स्वाइन फ्लू’ने हल्ली पडणाऱ्या पावसातही प्रकोप कायम ठेवला आहे. आरोग्य विभागाकडे गुरुवारी आणखी ३ मृत्यूंची नोंद झाली असून गेल्या सहा महिन्यात या आजाराने दगावलेल्यांची संख्या आता थेट ३४ वर पोहोचली आहे.

बेबी चोपडे (६३) रा. जुना बाबूलखेडा, विकासनगर, नागपूर आणि इतर दोन असे या आजाराने दगावलेल्या रुग्णांची नावे आहे. चोपडे या गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या क्रिटिकेअर या रुग्णालयात तर इतर दोन रुग्णही शहरातील दुसऱ्या रुग्णालयांत उपचार घेत होते. त्यांच्या तपासणी अहवालात त्यांना हा आजार असल्याचे पुढे आले.

उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यातच हल्ली पूर्व विदर्भाच्या बऱ्याच भागात पाऊस पडत असून त्यामुळे तापमानही घसरले आहे. हे वातावरण ‘स्वाइन फ्लू’ला जास्त पोषक आहे. तेव्हा या काळात हा आजार आणखी वेगाने पसरण्याचा धोका आहे. हा धोका असतांनाही शहरात आणखी दगावलेल्यांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंता वाढल्या आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०१७ ते १५ जून २०१७ दरम्यान नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ात या आजाराने आढळलेल्या रुग्णांची संख्याही आता थेट १२१वर पोहचली आहे. रुग्ण वाढत असताना त्यांच्यावर उपचार होत असले तरी त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा महापालिकेसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अद्यापही फारसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळणार कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून आजार नियंत्रणाकरिता पूर्ण प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला.

पूर्व विदर्भात नागपुरात सर्वाधिक मृत्यू

नागपूर विभागातील सर्वाधिक २१ मृत्यू केवळ नागपूर शहर आणि ग्रामीणला नोंदवण्यात आले आहे. तर १३ रुग्ण हे मध्यप्रदेशातून नागपुरात रेफर झालेले विविध रुग्णालयातील आहे. दगावले आहे. भंडारा व चंद्रपूर जिल्ह्य़ातही प्रत्येकी एक मृत्यू झाला असून फक्त जून महिन्यात दगावलेल्यांची संख्या ४ आहे.

शहरात स्वाइन फ्लूच्या उपकरणांचा पत्ताच नाही

नागपुरात दोन वर्षांपूर्वी ‘स्वाइन फ्लू’मुळे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण दगावल्याचे बघत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने मेडिकल व मेयोला ३ कोटींचे उपकरण देण्याची घोषणा केली होती. त्यात व्हेंटिलेटर, मेडिकलमध्ये ‘स्वाईन फ्लू’ तपासणी करणारे यंत्रासह इतर उपकरणांचा समावेश होता. परंतु दोन वर्षांपासून या उपकरणांचा पत्ताच नसल्याचे चित्र आहे.