यवतमाळ : महागाव तालुक्यातील एक मंडळ अधिकारी आणि दोन तलाठ्यांना गौण खनिज प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत जिल्ह्यातील ६५० तलाठी आणि १२२ मंडळ अधिकारी गेल्या १७ दिवसांपासून आंदोलन करीत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली कारवाई बिनशर्त मागे घ्यावी या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. महागाव तालुक्यात २०२१ मध्ये गौण खनिज प्रकरणात जप्तीची कारवाई झाली होती. जप्त केलेले खनिज लिलाव पद्धतीने हर्रास करण्यात आले. त्याचे पैसे शासन दप्तरी जमा करण्यात आले. मात्र या रेतीसाठ्याची पावती तहसीलदारांनी तलाठ्यांना दिली नाही, असा आरोप आहे. या भागामध्ये गौण खनिजाच्या चोरीचे प्रमाण वाढले. या कारणावरून आणि हर्रास केलेल्या रेतीच्या पावत्या सादर न केल्याने फुलसावंगीचे तलाठी आय.जी. चव्हाण आणि टेंभीचे तलाठी बी.बी. चव्हाण व मंडळ अधिकारी कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना प्रशासनाने त्यांची बाजू ऐकून घेतली नाही, असा आरोप तलाठी संघटनेने केला आहे.
या कारवाईविरोधात महागाव आणि उमरखेड तालुक्यातील कामकाज आंदोलकांनी बंद पाडले. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना हमी केंद्रावर हरभरा विक्रीची नोंदणी करण्यात अनंत अडचणी येत आहे. आता हे आंदोलन जिल्ह्यात सर्वत्र सुरू करण्यात आले. तलाठी संघटनेने १३ मार्चला ऑनलाइन स्वाक्षरीच्या ‘डीएससी’ (प्रमाणपत्रावर असलेली डिजिटल स्वाक्षरी) तहसीलला जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढविण्याची रणनीती आंदोलकांनी आखली आहे. या आंदोलनामुळे हरभरा विक्रीची नोंदणी, शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपडेट करणे, सातबारा अद्ययावतीकरण, शेतसारा वसुली आदी कामे थांबली आहेl. शिवाय रेती घाटावरील गौण खनिज उपशाकडे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे फावले आहे.
हेही वाचा >>> नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी दोषी? अहवाल सादर होऊनही कारवाई नाही
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. या प्रकरणात बाजू जाणून न घेता एकतर्फी कारवाई झाली आहे. निलंबन बिनशर्त मागे घेण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विदर्भ पटवारी संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी तलाठ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक चालली, मात्र त्यात या आंदोलनासंदर्भात तोडगा निघाला नाही. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विदर्भ पटवारी संघ व मंडळ अधिकारी संघाच्या अध्यक्ष, सचिवांना पत्र लिहून, या गौण खनिज प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक अधिकाऱ्यांनी मोजणी केल्यानंतर वाळूसाठ्यात वाढ झाली. यामुळे या प्रकरणी संबंधितांविरुद्ध केलेली कारवाई नियमानुसार योग्य आहे. तलाठ्यांचे हे आंदोलन बेकायदेशीर असून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलन त्वरित मागे घ्यावे व कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहन या पत्रात केले आहे.