अमरावती : वर्षभरापासून अनेक उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण विभागाने सातत्य राखले असताना आता भर उन्हाळ्यात शिक्षकांच्या डोक्यावर निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाचा भार दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शालेय परीक्षा संपल्यानंतर पालकांचे आपल्या पाल्यां-सह उन्हाळी सुट्टयांचे नियोजन असते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी बाहेर असतात. अशावेळी उन्हाळी शिबिराचे नाव देऊन निपुण महाराष्ट्र अभियानाच्या कृती कार्यक्रमाला किती विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती असेल यावर शंका व्यक्त केली आहे. निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमातून विद्यार्थ्याला घराच्या बाहेर पाडायला भाग लावणे हे धोकादायक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमात शासनाने दिलेल्या लिंकवर एकूण २० प्रकारची माहिती शिक्षकांना भरावयाची आहे. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे ६ मे २०२५ चे पत्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांना निर्देशित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शालेय वेळेमध्ये कृती कार्यक्रम सर्व शाळांमध्ये सुरू आहे.

या उपक्रमांतर्गत अल्पकालीन शैक्षणिक शिबिराद्वारे विद्यार्थ्यांमधील संभाव्य शैक्षणिक तफावत भरून काढण्यास मदत होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सातत्य राखले जाऊ शकेल.

या उपक्रमा अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, अंक ज्ञान व गणित प्रक्रिया करता याव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येईल. दररोज किमान आपल्या वेळेनुसार गावातील स्वयंसेवक (शाळेतील मुख्याध्यापक यांच्यामार्फत निवड करण्यात येणारे) व लीडरमाता किंवा सदस्यमाता मार्फत शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन केल्यास हे उद्दिष्ट सहज साध्य करता येईल. निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य करणे व विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी सदुपयोग आणण्याकरिता तालुकास्तरावर सर्व शाळांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. या दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात यावे. शिबिर दरम्यान योगा, मनोरंजन, शैक्षणिक उपक्रम इत्यादी घेण्यात यावे. केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयाला सादर करावा. वरील बाबींच्या (सनियंत्रण करणारे अधिकारी व कर्मचारी) यांनी शाळांना उन्हाळी शिबिरांना प्रत्यक्ष भेटी देऊन सह नियंत्रण करावे तसेच केंद्रप्रमुख यांना स्वयंसेवकाची नोंदणी दिलेल्या लिंकमध्ये करणे आवश्यक आहे.