चंद्रपूर : चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दहा गावात नीळ्या रेषेच्या (ब्लू लाईन) आत अकृषक जमिनीवर अनधिकृत अभिन्यास (ले-आऊट) टाकून विक्री करणाऱ्या १०९ भूखंड धारक व जमिन व्यवसायिकांना तहसीलदारांनी नोटीस बजावली व भखंड विक्री व बांधकाम तत्काळ थांबविण्याची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या सर्व भूखंडावरील प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पाहणी केली जाणार आहे. तसेच भूखंड विक्री थांबवा अन्यथा कारवाई करू असाही इशारा नोटीस मधून देण्यात आला आहे.

महापालिका हद्दी लगत दाताळा, कोसारा, चोराळा, देवाडा, आरवट, हिंगनाळा, शिवनी चोर, बोर रिठ, पडोली व खुटाळा ही गावे आहेत. या गावांमध्ये भूखंड व्यवसायिक तसेच ले-आऊट धारकांनी मोठ्या प्रमाणात अकृषक जमिनी खरेदी करून ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे या जमिनी नील रेषा (ब्लू लाईन) आत आहेत. पूरग्रस्त भागातील या जमिनीवर अभिन्यास पाडून भूखंड विक्रीचा गोरखधंदा येथे सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येताच या दहा गावातील १०९ प्लॉट धारक व जमिन व्यवसायिकांना तहसीलदार विजय पवार यांनी नोटीस बजावून जमिन विक्री व बांधकाम तत्काळ थांबवा, अशी नोटीस बजावली. नोटीस बजावलेल्यांमध्ये इरई नदी लगतच्या दाताळा गावातील ३५ प्लॉट धारक, कोसारा १२, चोराळा ११, देवाडा ४, आरवट ११, हिंगनाळा १, शिवनी चोर २, बोर रिठ २५, पडोली ४ व खुटाळा ४ अशा एकूण १०९ जणांना यात समावेश आहे.

या जमिनीचे एकूण क्षेत्राफळ १३५.०९ हे.आर. आहे. नोटीसमध्ये जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार निळ्या रेषेच्या (ब्लू लाईन) आत असलेल्या बांधकाम व निवासी अभिन्यास (ले-आऊट) प्रतिबंधीत आहे. सदर ठिकाणी सिमेंटचे पोल लावले आहेत तसेच कच्चे रस्ते लेआऊट तयार करण्यात आलेले आहे. हे सर्व अनधिकृत आहेत. येथे काही ठिकाणी बांधकाम झाले आहे. भूखंड देखील अनधिकृत आहेत असेही या नोटीस मध्ये नमु आहे. विशेष म्हणजे या ले आऊट धारकांमध्ये शहरातील राजकीय पक्षाचे नेते, नामवंत व्यवसायिक तसेच बांधकाम व्यवसायिक, बांधकाम ठेकेदारांचा समावेश आहे. तहसीलदारांची नोटीस हाती पडताच या सर्वांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय पवार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी त्याला दुजोरा दिला. प्रकरण हाताळणारे नायब तहसीलदार राजू धांडे यांनीही नोटीस पाठविली असून आता प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करणार असल्याचे सांगितले

Story img Loader