नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. कोरड्या हवामानामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. साधारणपणे होळीनंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. यावेळी मात्र होळीच्या आधीपासूनच तापमानाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे होळीनंतर त्यात आणखी वाढ होणार हे निश्चित आहे.

विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण असले तरीही त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या राज्यात तापमानवाढीला सुरुवात झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी ती सुरुच राहणार आहे. दुपारच्या वेळी अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांची तीव्रता अधिक प्रकर्षाने जाणवणार आहे.

हेही वाचा…सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान

तर, हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होणार असून, हवामान कोरडे राहणार आहे. विदर्भातील तीन जिल्ह्यात आताच तापमानाने चाळीशी ओलांडली आहे, तर अनेक जिल्ह्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. थोड्याफार फरकाने ते कमीअधिक राहू शकेल. तर मराठवाड्यात देखील तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या घरात राहणार असून, आठवड्याच्या शेवटी मात्र तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणातही तापमान वाढ पाहायला मिळू शकते.