राज्यातील सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाच्या प्रस्तावाचे परीक्षण करण्यासाठी महसूल विभागनिहाय चार उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५व्या बैठकीदरम्यान धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी हे प्रस्ताव मंडळाची उपसमिती तयार करून तिच्याकडे परीक्षणासाठी पाठवण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता.
अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६नुसार, वनवासी अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांच्या हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी वनहक्क कायद्याच्या कलम दोन(ब)नुसार धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणे अपेक्षित आहे. यामुळे वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास उपलब्ध होईल. याबाबत केंद्र शासनाने चार जानेवारी २०१८च्या पत्रान्वये धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास अधिसूचित करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित के ल्या आहेत. राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकू ण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. एका उपसमितीला प्रस्ताव पडताळणीचे काम दिल्यास विलंब होऊ शकतो, हे लक्षात घेऊन महसूल विभागनिहाय चार उपसमित्या गठित करण्यात आल्या आहेत. या चारही उपसमित्यांना प्राप्त होणारे प्रस्ताव धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मितीसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आहेत किं वा नाही, धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मिती करताना स्थानिक लोकांचे हित जोपासले जात आहे का, धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास निर्मिती करताना जैवविविधतेचे संवर्धन होईल की नाही, याबाबत तपासणी करायची आहे. समितीकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत संस्करण करून समिती अहवाल सादर करेल.
जबाबदारी कोणावर?
नागपूर विभागाकरिता अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव, पूर्व) यांची समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून यात राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, बंडू धोत्रे व पूनम धनवटे यांचा समावेश आहे. अमरावती विभागाकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक समन्वयक अधिकारी असून राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे व यादव तरटे पाटील यात आहेत. कोकण आणि नाशिक विभागाकरिता अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव, पश्चिम) समन्वयक अधिकारी असून राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिष अंधेरिया, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रतिनिधी, बिट्टू सहगल व विश्वास काटधरे सहभागी असतील. पुणे आणि औरंगाबाद विभागाकरिता राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर व अनुज खरे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.