नागपूर : धावत्या रेल्वेच्या शौचालयच्या खिडकीतून एक आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला. ही घटना गुमगाव ते बूटीबाेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी घडली. संजयकुमार तपनकुमार जाणा (३०, गोपीनाथपूर, कुरपाई-पश्चिम बंगाल) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील फरसखाना पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
पुणे पोलिसांनी संजय कुमारला अटक केली. त्याला पाच दिवसांच्या ‘ट्रांझिस्ट रिमांड’वर पश्चिम बंगालमधून पुण्यात नेण्यात येत होते. हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेस रेल्वेगाडी नागपूरवरून बुटीबोरीपर्यंत पोहचल्यानंतर संजय कुमारने शौचालयाला जाण्याचा बहाणा केला. पाचही पोलिसांनी त्याला शौचालयात नेले आणि ते बाहेर उभे झाले. आरोपीने धावत्या रेल्वेच्या शौचालयाच्या खिडकीच्या काचा फोडून पसार झाला. बराच वेळ झाला तरी आरोपी बाहेर न आल्याने पोलिसांनी धावपळ केली. दरम्यान आरोपीने खूप दूर पळ काढला होता.



