Nitin Gadkari on Politician: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या मोकळ्या ढाकळ्या विधानांसाठी चर्चेत असतात. केंद्रीय मंत्री आणि राजकीय पुढारी असूनही राजकारणातल्या चुकीच्या बाबींवर परखड भाष्य करण्यास ते कचरत नाहीत. बऱ्याचदा त्यांचा रोख प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईकडेही असतो. आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांची कधी ते खरडपट्टी करतात तर कधी आपल्याच क्षेत्रातील पुढाऱ्यांना बोल लावतात. आताही त्यांनी चांगला पुढारी कसा असतो, याबाबत एक विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जो लोकांना सर्वाधिक मूर्ख बनवू शकतो, तो सर्वात चांगला नेता होऊ शकतो.
नागपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय महानुभाव पंथांच्या संमेलनात बोलत असताना त्यांनी राजकारण आणि इतर विषयांवर भाष्य केले.
संमेलनात उपस्थित असलेल्या संत-महंतांना उद्देशून बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, सरकारपासून दूर राहत जा. मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो. तुम्ही वारंवार सरकारकडेच मागण्या करत असता. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी मंत्र्यांच्या गळ्यात हार घालून कामे करून घेत रहा. पण आपल्या पंथ आणि संप्रदायात मंत्र्यांना घुसू देऊ नका. त्यांना यापासून दूर ठेवा.
“राजकारण, समाजकारण आणि विकासकारण वेगळे आहे. तुम्ही धर्मकारणात आहात. धर्मकारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. कारण आम्ही राजकीय लोक जिथे घुसतो, तिथे आग लावल्याशिवाय राहत नाही. मग महंत आपसात गादीसाठी भांडायला लागतात. मग मंत्री त्याला स्थगिती देतो आणि समिती नेमतो आणि दोन्ही महंत मग आमच्याकडे चकरा मारतात”, असे नितीन गडकरी यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
धर्मकारण सत्तेपासून दूर हवे
नितीन गडकरी पुढे म्हणाले, धर्मकारण हे सत्तेपासून दूर असले पाहिजे. विक्रमादित्य सिहांसिनावर बसण्याआधी धर्मगुरूने त्याच्या पाठीवर चाबूक मारले होते. राजा नाही धर्म श्रेष्ठ आहे. सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता हा स्वामीजींनी दिलेल्या शिकवणुकीवर समाजात बदल कसे होतील, हे पाहिले पाहिजे. बोलणे सोपे आहे, पण करणे कठीण आहे.
नितीन गडकरींचे वरी भाष्य खालील व्हिडीओत ९ व्या मिनिटांपासून पुढे ऐकू शकता:
जो सर्वाधिक मूर्ख बनवतो, तोच चांगला…
नितीन गडकरी राजकीय पुढाऱ्यांबाबत बोलताना म्हणाले, “मी ज्या क्षेत्रात काम करतो. तिथे मनापासून खरे बोलण्याला मनाई आहे. तिथे हवशे, नवशे आणि गवशे आहेत. जो लोकांना सर्वाधिक मूर्ख बनवू शकतो, तो सर्वात चांगला नेता होऊ शकतो. पण भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘अंतिम विजय हा सत्याचा होतो.’ एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकट नक्कीच आहे. पण एक तत्त्ववेत्त्याने सांगितल्याप्रमाणे ‘शॉर्टकट विल यू कट शॉर्ट.’ म्हणूनच आपल्यात प्रामाणिकपणा, सत्वशीलता, सच्चेपणा, पारदर्शकता, समर्पकता हे मूल्य असले पाहिजेत.”