चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील २१० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक ३ आणि ४ ला कोळसा पुरवठा करणारा ‘कन्व्हेयर बेल्ट स्ट्रक्चर’सह शुक्रवारी पहाटे दोन वाजता कोसळला. या घटनेनंतर २१० मेगावाॅटच्या संच क्रमांक ३ मधील वीजनिर्मिती पूर्णत: ठप्प झाली आहे. तर ४ क्रमांकाचा संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. देखभाल व दुरुस्तीत वीज केंद्र व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याचे तज्ज्ञांचे मत आहे तर वीज केंद्राचे अधिकारी वादळी पावसाचे कारण समोर करत असल्याने नेमके काय झाले, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

एकूण सात संचातून २९२० मेगावॉट वीजनिर्मिती करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला बिघाड व नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. या केंद्रात ५०० मेगावॉटचे ५ तर २१० मेगावॉटचे २ संच कार्यरत आहे. यातील संच क्रमांक ३ आणि ४ सन १९८६ पासून म्हणजेच ३९ वर्षांपासून वीजनिर्मिती करीत आहे. याच दोन संचांना कोळसा पुरवठा करणारा ‘कन्व्हेयर बेल्ट स्ट्रक्चर’सह खाली कोसळला. पहाटे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, वीज केंद्राचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

वीज केंद्रातील एका अभियंत्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, ३९ वर्षांपासून या ‘कन्व्हेयर बेल्ट’मधून कोळसा पुरवण्याचे काम सुरू आहे. याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोट्यवधीची कंत्राटे काही ठराविक कंत्राटदारांना दिली जात आहेत. कंत्राटदारांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली, असे त्यांचे म्हणणे आहे. वीज केंद्राचे अधिकारी आता पाऊस आणि वादळाला जबाबदार धरून संबंधित कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान या घटनेची एक समिती गठित करून चौकशी केली जाणार असल्याची माहिती वीज केंद्राकडून देण्यात आली.

‘स्ट्रक्चरल ऑडिट’ कागदावरच?

साधारण प्रत्येक २ ते ३ वर्षांनी मोठ्या वीज केंद्रात ऑडिट होते. अहवाल तयार केला जातो. तसेच सुरक्षेसाठी विविध उपाययोजना असताना ‘कन्व्हेयर बेल्ट’ कोसळला कसा, असा प्रश्न विचारला जात आहे. या घटनेमुळे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ कागदावरच असावे अशी चर्चा आहे. सुरक्षिततेसाठी यात कोणताही बिघाड आल्यास ‘सेन्सर्स’ अथवा अलार्म असतो. त्यामुळे ही घटना घडलीच कशी असाही प्रश्न उपस्थित होत आहे.