चंद्रपूर : भाजपच्या चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा मतदार संघातील मंडळ अध्यक्षांची निवड प्रक्रिया प्रदेश महामंत्री रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय तणावपूर्ण वातावरणात पार पडली.

विशेष म्हणजे, पक्षाने ठरवून दिलेल्या निकष पूर्ण करणाऱ्यांनाच अभिप्राय नोंदविण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यावरही काहींनी आक्षेप नोंदविला. दरम्यान येत्या दोन दिवसात मंडळ अध्यक्षांच्या नावांची घोषणा प्रदेश कार्यालयातून केली जाईल अशी माहिती आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे जिल्हा भाजपातील वाद उघडपणे चव्हाट्यावर आले आहेत.

प्रदेश भाजपच्या बैठकीत चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्षांच्या निवड प्रक्रीयेवर आमदार किशोर जोरगेवार आणि माजी आमदार संजय धोटे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर शुक्रवार २५ एप्रिल रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयात अभिप्राय नोंदविण्याठी बैठक झाली. जिल्हा आणि चंद्रपूर शहर कार्यकारीणीवर आमदार मुनगंटीवारांचे वर्चस्व आहे.

तेव्हा संघटनेवर वर्चस्व मिळविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर सक्रीय झाले. मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रीया राबविण्यासाठी प्रदेश महामंत्री रणजित सावरकर यांना निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. सकाळी दहा वाजेपासून ही प्रकीया सुरु झाली. सुरूवातीला मंडळ निहाय मतदारांची यादी सावरकर यांनी वाचून दाखविली. या यादीतील काही नावांवर माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही नावे वगळण्यात आली. त्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वाद झाले. निकषात बसणाऱ्यांनाच अभिप्राय नोंदविण्याचा हक्क देण्यात आला.

त्यामुळे मतदारांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी झाली. पदाधिकाऱ्यांनी आपल्यासोबत कार्यकर्त्याचा मोठा फौजफाटा आणला होता. त्यामुळे तणावाचा परिस्थिती निर्माण झाली होती. आमदार जोरगेवार आणि ऱाष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्य़क्ष हंसराज अहीर यांनी ही निवड प्रक्रीया प्रतिष्ठेची केली होती. विशेष म्हणजे जोरगेवार व अहीर यांनी एका दिवसात तीन बैठका घेवून सक्रीयता दाखविली. तर मुनगंटीवार यांनीही हालचाली केल्या. इरई नदी खोलीकरण कार्यक्रमातून वेळात वेळ काढून स्वतः आमदार जोरगेवार अभिप्राय नोंदविण्यासाठी हजर होते. अहीर व जोरगेवार या दोघांनीही गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेवून त्यांना आपल्या बाजुने वळविण्याचा प्रयत्न केला. तो नेमका किती यशस्वी झाला ते मंडळ अध्यक्षांच्या नावाची घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र या निमित्ताने भाजपातील अंतर्गत वाद किती विकोपाला गेला आहे, याचे दर्शन झाले.

विशेष म्हणजे, मंडळ अध्यक्षांची निवड प्रक्रीया पार पाडण्यासाठी निरीक्षक म्हणून प्रदेश महामंत्री रणजित सावरकर चंद्रपुरात दाखल झाले. तत्पूर्वी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या स्वागताचे फलक शहरात लावले होते. शामा प्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या परिसरातही ते फलक होते. त्यानंतर स्वागत राहून गेल्याची बाब आमदार किशोर जोरगेवार यांच्या लक्षात आली. त्यांनीही कुरघोडी करीत तत्काळ स्वागत फलकाची व्यवस्था केली. एकूणच भाजपात मंडळ अध्यक्ष निवड प्रक्रियेत तणावपूर्ण वातावरण दिसत होते.

राजुरा येथे मंडळ अध्यक्ष निवडपक्रियेत एकीकडे आमदार देवराव भोंगळे तर दुसरीकडे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहीर व माजी आमदार संजय धोटे सक्रीय होते. तर मागून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस या देखील या पक्रियेत सक्रीय होत्या.*