चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा बँकेच्या ९०० मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, बँकेचे माजी संचालक सुभाष रघाताटे यांचे अंतिम यादीत नाव नसल्याने त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार गुरुवार २२ मे रोजी ९०० मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली गेली. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात मतदारांची ही यादी लावण्यात आली आहे. या यादीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षातील मातब्बर नेत्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, पक्षाचे पदाधिकारी यांना संधी देण्याऐवजी खासदार, आमदार तथा माजी मंत्री यांनी स्वत:च संचालक पदाची निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच बँकेच्या अंतिम यादीत बँकेची तात्पुरती मतदार यादी पाहिली असता माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवर, खासदार प्रतिभा धानोरकर, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार यादीच्या माध्यमातून पक्की दावेदारी दाखल केलेली आहे.
तसेच बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, सुदर्शन निमकर, ॲड. वासुदेव खेळकर, वसंत विधाते, जी.के. उपरे, रामनाथ कालसर्पे यांचेही नाव मतदार यादीत आहे. यासोबतच बाजार समितीचे माजी सभापती दावेदारी दिनेश चोखारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूरकर, काँग्रेस पक्षातून भाजपात आलेले प्रकाश देवतळे, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, प्रशांत चिटणुरवार, आशुतोष चटप, अमर बोधलावार, जयंत टेमुर्डे, रामभाऊ टोंगे, रवींद्र मारपल्लीवर, चंद्रकांत गुरु, विलास विखार, श्यामकांत थेरे यांचेही नाव मतदार यादीत आहे. विशेष म्हणजे, या सर्वांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
बल्लारपूरातून मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक प्रशांत कोलप्याकवार, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष डॉ. रजनी हजारे, विद्यमान संचालक संजय तोटावार, सिंदेवाही तालुक्यातून विद्यमान संचालक प्रकाश बनसोड, विजय वडेट्टीवार, प्रफुल्ल खापर्डे यांची नावे आहेत. बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष रावत, संजय घाटे, चंदू मारगोनवार, राजुरा तालुक्यातून आशुतोष चटप, अरुण धोटे, सिद्धार्थ पथाडे, शेखर धोटे, वरोरा तालुक्यातून प्रकाश मुथा, कोरपनामधून विजय बावणे, शेखर धोटे, विकास दिवे, चंद्रपूरमधून आमदार किशोर जोरगेवार, माजी मंत्री शोभा फडणवीस, चंद्रकांत गोहोकार, रिता सुभाष रघाताटे, श्यामकांत थेरे, बंडू हजारे, सुरेंद्र अडबाले, संतोष अतकारे, कन्यका बँक अध्यक्ष डॉ. विजय आईंचवार, बँकेचे माजी व्यवस्थापक राजेंद्र बरडे, उमाकांत धांडे, परशुराम धोटे, राजू धांडे, दीपक पारख, प्रभा वासाडे यांच्या नावांचा समावेश आहे.
अधिसूचना दहा दिवसात
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची अधिसूचना येत्या दहा दिवसात निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिसूचना निघताच खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.