भारतातील वन्यप्राणी आणि पक्ष्यांसाठी असणारे पहिले ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र’ आता वनखात्यालाच नकोसे झाले आहे. वाघ, बिबट्यासह इतरही वन्यप्राणी आणि पक्ष्यांवर उपचार करुन त्यांना नैसर्गिक अधिवास मिळवून देणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यांच्या वेतनासाठी आणि केंद्राच्या एकूण खर्चासाठी लागणाऱ्या निधीसाठी खात्यातीलच अधिकारी आता एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर : आसोलामेंढा नहरात पाच मुले बुडाली ; चौघांना वाचविण्यात यश, मुलगी बेपत्ता

वन्यप्राण्यांवर उपचार करणारे अनेक केंद्र आहेत, पण त्यांच्यावर उपचार करुन नैसर्गिक अधिवासात मुक्त करणारे भारतातील पहिले केंद्र नागपूर वनखात्याने सेमिनरी हिल्सवर उभारले. मात्र, वन्यप्राण्यांवर उपचार करणारा आणि त्यांना नैसर्गिक अधिवास परत मिळवणारा पशुवैद्यक व इथला कर्मचारी वर्ग गेल्या काही महिन्यांपासून वेतनाविना काम करत आहे. तर बाहेरून येणाऱ्या मदतीच्या बळावर वन्यप्राण्यांचे खाद्य आणि उपचाराची कशीबशी व्यवस्था होत आहे. दोन पशुवैद्यक, दोन सहकारी, आठ मदतनीस यांच्या वेतनावर वर्षाला सुमारे ४० ते ४५ लाख रुपये खर्च येतो. तर जखमी वन्यप्राण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकांना लागणारे इंधन, त्यांचे खाद्य, औषधे याचाही वर्षाचा खर्च सुमारे एक कोटी आहे. आतापर्यंत वेतनासह हा निधी खात्यातून देण्यात येत होता. करोनाकाळात तो खात्यातील ‘कॅम्पा’कडून (कॅम्पन्सेटरी अफारेस्ट्रेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लानिंग ऑथॉरिटी) देण्यात आला. पहिल्या वर्षात ५१ लाख, दुसऱ्या वर्षी ७० लाख रुपये देण्यात आले. तर यावर्षी ७५ लाखांची मागणी करुनही अधिकाऱ्यांनी फक्त वेतनाचेच पैसे देऊ, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, वन्यजीवांना घटनास्थळावरून आणण्यासाठी वाहनाला लागणारे इंधन, त्यांच्या उपचारासाठी लागणारी औषधे, त्यांचे खाद्य यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत त्यांनी हात वर केले आहेत. या केंद्राला वनखात्याचे तत्कालीन प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी बळ दिले होते. २२ डिसेंबर २०१५ ला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. त्यांच्याच हातात पुन्हा खात्याची धूरा आली असताना अधिकाऱ्यांची भूमिका मात्र संभ्रमात टाकणारी आहे. संबंधित अधिकारीही यावर काही बोलायला तयार नाहीत.

हेही वाचा – बुलढाणा : पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या युवकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ केंद्रे उभारली जाणार
केंद्राच्या कामाचे अचंबित झालेल्या कॅनडातील एका युवतीने जखमी पक्ष्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना उडण्याचा सराव करण्यासाठी मोठा खुला पिंजरा तयार करून दिला. तर इंग्लंडमधील ‘किटकॅट सँच्युरी’च्या समूहाने देखील मदतीसाठी हात समोर केला. या केंद्राच्या धर्तीवर राजस्थानमधील रणथंबोर, भरतपूर येथे तसेच पंजाब, तेलंगणा येथेही केंद्र उभारले जात आहे. तेथील वनखात्याने त्यासाठी या केंद्राला भेट दिली. तर महाराष्ट्रातही तत्कालीन मुख्यमंत्री व राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या निर्देशावरून राज्यात ठिकठिकाणी अशी ११ केंद्रे उभारली जात आहेत.
अधिकाऱ्यांशी बोलणार – वनमंत्रीवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याविषयी माहिती दिली असता ते देखील अचंबित झाले. ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्र’ बंद होणार नाही, अशी भूमिका त्यांनी ‘लोकसत्ता’जवळ मांडली. याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.