नागपूर लगत खापरी ते बुटीबोरीपर्यंतचा १९ कि.मी.चा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी तर कमी होईलच.शिवाय शेतकऱ्यांनाही त्यांचा शेतमाल नागपूरमध्ये जलदगतीने आणता येईल. नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच खापरी ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या महामार्गाच्या कामाचा आढावा गडकरींनी घेतला.

बुटीबोरी येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून त्यालाच लागून मिहान व एसईझेड आहे. त्यामुळे बुटीबोरी औद्योगिक नगरी म्हणून पुढे येत आहे. सध्या नागपूर ते बुटीबोरी हा दुपदरी रस्ता असला तरी वाहनांच्या वर्दळीमुळे येथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्ता सहा पदरी करण्यात येत आहे. खापरी उड्डाण पुलानंतर हा रस्ता सुरू होईल. ५० वर्षानंतर स्थिती काय राहील हे अपेक्षित धरून या महामार्गाचे नियोजन करावे, अशा सूचना गडकरी यांनी दिल्या.

तसेच, दोन्ही बाजूंचे सर्विस रस्ते रुंद करा, तेथील अतिक्रमण काढा. वाहतुकीत येणारे अडथळे दूर करा, असे गडकरी म्हणाले. ज्या ठिकाणी चौक आहे. सर्व बाजूंचे रस्ते मिळतात त्या ठिकाणचे सौंदर्यीकरण व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या मोकळ्या जागांवर वृक्षारोपण करा. शक्यतो फळझाडांची लागवड करून पक्ष्यांसाठी व्यवस्था करा, असेही निर्देश गडकरी यांनी दिले आहेत.

इंदोरा- दिघोरी चौक उड्डाणपुलाचाही आढावा –

इंदोरा ते दिघोरी चौक-कमाल चौक मॉलपर्यंत नव्याने तयार होणार्‍या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा गडकरी यांनी घेतला. यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले.बैठकीत गडकरी यांनी अधिकार्‍यांना काही सूचना केल्या.