अमरावती : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार २५० रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना ३०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.
उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांना आतापर्यंत प्रति तास १५० रुपये मानधन मिळत होते, ते आता ३०० रुपये प्रति तास करण्यात आले आहे. तर माध्यमिकच्या शिक्षकांसाठी पूर्वीचे मानधन १२० रुपये होते, ते सुधारित करून २५० रुपये करण्यात आले आहे.
घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे अर्हताप्राप्त असावेत. अर्हता पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये. तसेच घड्याळी शिक्षकांची मानधन नियमितपणे अदा करण्यात येईल याची शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांनी दक्षता घ्यावी, असे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसेल तर अशा विषयाच्या अध्यापनासाठी अर्हता प्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येते. त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते.
यापुर्वी २०२२ मध्ये घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली होती. २०२२ पुर्वी माध्यमिकला ४२ रुपये आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी ७२ रुपये दर निश्चित केलेला होता.
घड्याळी तासिका तत्त्वानुसार काम करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे शिक्षक मिळत नाहीत, अशी ओरड होती. २०२२ मध्ये सरकारने दरवाढ केली, तरी या अल्प मानधनावर शिक्षक काम करण्यास तयार होत नव्हते. कारण त्यांचे एकूण मानसिक मानधन आठ ते दहा हजार रुपयांच्या मर्यादेच होते. त्यामुळे त्यांचा ओढा खासगी शिकवणी वर्गांत शिकवण्याकडे असतो, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत होते.
राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या रजा कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार घड्याळी तासिका शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येतात. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या घड्याळी शिक्षकांना देखील मानधन वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त होतात.