जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या नियोजनबद्ध योजनांमुळे देशात वाघांची संख्या वाढली, अशा शब्दात भारतातील वाढलेल्या वाघांचे श्रेय अप्रत्यक्षपणे देशाच्या पंतप्रधानांना देण्याचा प्रयत्न केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने चंद्रपूर येथील वनप्रबोधिनीत जागतिक व्याघ्रदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सचिव एस.पी. यादव, अतिरिक्त महासंचालक (वन्यजीव) विभाष रंजन, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) वाय.एल.पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आदी उपस्थित होते. व्याघ्र संरक्षण व संवर्धनासाठी देशात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. गेल्या पाच दशकात व्याघ्रप्रकल्पांची संख्या नऊवरून ५२ पर्यंत वाढली आहे, असे सांगत याचे देखील श्रेय यादव यांनी घेण्याचा प्रयत्न केला. वाघ हा भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पाच सार्वजनिक उपक्रम घेऊन समोर जात आहे. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याला परत आणण्यासाठी सुद्धा भारताने प्राधान्याने उपक्रम हाती घेतला आहे.

येत्या १५ ऑगस्टपर्यंत भारतात चित्ता परतण्याची शक्यता आहे. भारतात ५२ व्याघ्रप्रकल्पांसोबतच ३२ हत्तीसंवर्धन प्रकल्प असून केंद्राच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे भूपेंद्र यादव यांनी सूचित केले. वाघ हे शक्तीचे प्रतीक आहे आणि जैवविविधता, जंगल, पाणी आणि हवामान सुरक्षेचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो, असे मत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी व्यक्त केले. व्याघ्र संवर्धनात भारत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. कंबोडिया, चीन, बांगलादेश, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि रशिया यांसारख्या देशांना व्याघ्र संवर्धनासाठी एकत्र येण्यासाठी सहकार्य करत आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे चौबे म्हणाले. यावेळी जंगलात तथा व्याघ्र संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या देशातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार अमित मलिक यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची बैठक, केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठकही पार पडली.

गाभा क्षेत्रातील रात्र व मान्सून सफारीला नकार

भारतातील व्याघ्रप्रकल्पांमधील गाभा आणि बफर क्षेत्रात रात्र सफारी व मान्सून सफारीचा विषय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या बैठकीत निघताच केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी थेट नकार दिला. या मुद्यांवरुन बैठकीतच दोन गट दिसून आले. एका गटाने या दोन्ही सफारीला सहमती दर्शवली, तर एका गटाने त्याला विरोध दर्शवला. गाभा क्षेत्रात एकवेळ नकार मान्य आहे, पण बफर क्षेत्रात किमान या दोन्ही सफारी होऊ द्याव्यात. हे क्षेत्र माणूसही वापरतो आणि प्राणीही वापरतात. त्यामुळे येथे सफारी सुरु झाली तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि वन्यप्राण्यांना वाचवण्यासाठी ते समोर येतील, असे मत मांडण्यात आले. मात्र, यावर सदस्यांचे एकमत होऊ शकले नाही आणि केंद्रीय मंत्र्यांनी या सफारीला नकार दर्शवला. या बैठकीत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह गैरसरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.