नागपूर: नागपूरमध्ये २३ सप्टेंबरच्या पहाटे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका अंबाझरी परिसरातील नागपूर सुधार प्रण्यासच्या (एनआयटी) जलतरण तलावालाही बसला होता. येथे दीड- दोन फुट चिखल साचण्यासह तलावातील जल शुद्धिकरण यंत्रही बिघडले. शेवटी झपाट्याने दुरूस्ती होऊन ३३ दिवसांनी बुधवारी हा जलतरण तलाव पून्हा सुरू झाला आहे.

नागपुरातील एनआयटी जलतरण तलावाने अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय जलतरण खेळाडू दिले आहे. हा जलतरण तलाव अंबाझरी तलावातील पुराचे पाणी शिरल्याने २३ सप्टेंबरच्या पहाटे बंद पडला होता. पुराच्या दिवशी येथील जलतरण तलावाहून वर चार ते पाच फुट पाणी होते. त्यामुळे पाणी उतरल्यावर जलतरण तलावात दीड ते दोन फुट चिखल- दगड जमले होते. सोबत येथील सगळेच जल शुद्धिकरणसह इतरही यंत्र बिघडून या प्रकल्पाला सुमारे एक कोटींचा फटका बसला. या जलतरण तलावाची स्थिती बघून ते कधी सुरू होणार? हा प्रश्न नागरिक विचारत होते. शेवटी येथील देखभाल- दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या हनुमान स्पोट्स ॲकेडमीच्या पदाधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिवस- रात्र पूर्ण क्षमतेने दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नाने बुधवारी हा तलाव पून्हा जलतरणपटूंसाठी सुरू झाला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने एनआयटीचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, बनकर, भंडारकर यांच्यासह हनुमान स्पोट्स ॲकेडमीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत उगेमुगे, व्यवस्थापक अश्विन जनबंधू उपस्थित होते.